वैभववाडी – कोल्हापूर वाहतूक विस्कळीत : वाहतूक फोंडा, भुईबावडा घाटमार्गे वळविली
वार्ताहर / वैभववाडी:
अतिवृष्टीमुळे करुळ घाटमार्गावरील संरक्षक भिंत शुक्रवारी खचली असून वैभववाडी-कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या घाटात मोठय़ा प्रमाणात दरड कोसळून पडझड झाल्याने किमान आठ दिवस हा मार्ग बंद राहणार आहे. करुळ घाट बंद झाल्याने कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक फोंडा आणि भुईबावडा घाटमार्गे वळविण्यात आली आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा करुळ घाट हा प्रमुख मार्ग आहे. गेल्या तीन-चार दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे या घाटात दरडी कोसळण्याचे प्रकार सुरू आहेत. शुक्रवारी या घाटमार्गातील संरक्षक भिंत खचली. त्यामुळे या घाटमार्ग वाहतुकीसाठी पूर्णतः ठप्प झाला. वैभववाडी तहसीलदार रामदास झळके व सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱयांनी घटनास्थळी जात पाहणी केली. तर वैभववाडी पोलिसांनी शहरातील संभाजी चौकात बॅरिकेडस् लावून कोल्हापूरकडे जाणाऱया वाहनधारकांना फोंडाघाटमार्गे जाण्याची विनंती केली. भुईबावडा घाटातही ठिकठिकाणी दरड कोसळून माती, दगड रस्त्यावर आल्याने या मार्गावरील वाहतूकही एकेरी पद्धतीने सुरू होती. दरम्यान, तळेरे-वैभववाडी-कोल्हापूर या राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला असून लवकरच या मार्गाचे नूतनीकरण होणार आहे. सुमारे 50 वर्षे जुना असलेला करुळ घाटरस्ता दुरुस्त होणे गरजेचे आहे. या घाटरस्त्याच्या संरक्षक भिंती ढासळण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. कोल्हापूर शहराला जोडणारा जवळचा मार्ग हाच असल्याने रस्ता केव्हा दुरुस्त होणार, याकडे वाहन चालकांचे लक्ष लागून राहिले आहे.









