बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर/प्रतिनिधी बृह बेंगळूर महानगरपालिकेच्या प्रभागांची संख्या १९८ वरून २४३ करण्याची राज्य सरकारने अधिसूचना जारी केली आहे. बीबीएमपी वॉर्डच्या पुनर्रचनेसाठी उच्चस्तरीय समिती गठीत करून सहा महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याचा अर्थ असा की आता पुढील ८-९ महिन्यांसाठी बीबीएमपीची निवडणुक शक्य नाही.
नगरविकास विभागाचे प्रधान सचिव के.ए. हिदायत उल्ला यांच्या मते, बीबीएमपीचे आयुक्त समितीचे अध्यक्ष असतील.बेंगळूर शहर जिल्ह्याचे उपायुक्त, बेंगळूर विकास प्राधिकरणाचे (बीडीए) आयुक्त आणि बीबीएमपीचे महसूल विभागाचे विशेष आयुक्त हे सदस्य असतील. सहा महिन्यांनंतर ही समिती प्रभागांच्या पुनर्रचनेचा अहवाल सादर करेल. त्यानंतर २४३ प्रभागांची आरक्षण यादी जारी करण्यास अजून दोन-तीन महिने लागतील, त्यामुळे बीबीएमपी निवडणुकीला उशीर होण्याची शक्यता आहे.
२०१५ ची बीबीएमपी निवडणूक २०११ च्या जनगणनेनुसार घेण्यात आल्या. आता २०२१ ची जनगणना करण्याची वेळ आली आहे. नव्या जनगणनेच्या आधारे निवडणुका घेण्याचा निर्णय घेतल्यास प्रभागांची संख्या वाढवावी लागेल. परिणामी, बीबीएमपी निवडणुकीला उशीर होण्याची शक्यता आहे. कर्नाटक उच्च न्यायालयात कॉंग्रेसच्या काही नगरसेवकांनी बीबीएमपी निवडणुकांच्या दिरंगाईबद्दल जनहित याचिका दाखल केली होती.