नदीच्या पाणीपातळीत सहा फुटांनी वाढ : कल्लोळ-येडूर, मलिकवाड-दत्तवाड बंधारा पाण्याखाली : धरणातून मोठय़ा प्रमाणात पाण्याचा विसर्ग
वार्ताहर / एकसंबा
गेल्या चार दिवसापासून सर्वत्रच परतीच्या पावसाचा धुमाकूळ पहावयास मिळत आहे. तालुक्यातही पावसाची संततधर सुरू असल्याने त्याचा परिणाम दैनंदिन जीवनावर जाणवत आहे. तालुक्यासह पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस बरसात असल्याने पूर्ण क्षमतेने भरलेल्या धरणांमधून मोठय़ा प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. यामुळे कृष्णा नदीवरील कल्लोळ-येडूर दरम्यानचा बंधारा सहाव्यांदा पाण्याखाली गेला असून सहा फुटांनी पाणीपातळीत वाढ झाली आहे. असाच पाऊस कायम राहिल्यास आणखी पाणीपातळी वाढण्याची शक्यता आहे. याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे.
गतवषीप्रमाणे यंदाच्या वषीही ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाचा कहर सर्वत्र दिसून येत आहे. जून महिन्याच्या प्रारंभापासूनच चारही महिने पावसाने दमदार हजेरी लावली होती. सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसानंतर पुन्हा पाऊस होईल, याची कल्पना कोणालाच नव्हती. पण ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाल्याने अनेकांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. तसेच चार महिन्यापासून होत असलेल्या पावसाने भूजल पातळी वाढली आहे. त्यामुळे सध्या होत असलेल्या पावसाचे पाणी शेतांमध्ये मोठय़ा प्रमाणात साचत आहे. तसेच विहिरी, छोटे मोठे नाले, ओढे भरून वाहत आहेत.
तालुक्यात होत असलेल्या संततधर पावसामुळे सलग दुसऱ्या वषीही सर्वत्र पाणीच पाणी पहावयास मिळत आहे. पाण्यासाठी कासावीस झालेल्या दुष्काळी भागातही दमदार पाऊस झाल्याने विहिरी, कूपनलिका, तलाव त्यांच्या पाणीसाठय़ात मोठी वाढ झाली आहे. दुष्काळग्रस्त समजला जाणाऱ्या भागातही पावसाने दमदार हजेरी लावल्याने सदर भागातील नागरिकांतून समाधन व्यक्त होत आहे. दुष्काळी भागात जरी समाधन होत असले तरी नदीकाठी मात्र धास्ती निर्माण झाली आहे.