ऑनलाईन टीम / मुंबई :
अभिनेता विवेक ओबेरॉय याच्या मुंबईतील घरावर बेंगळूरच्या पोलिसांनी छापा टाकला आहे. दुपारी एक वाजता दोन इन्स्पेक्टर विवेक ओबेरॉयच्या घरी पोहोचले आणि छापेमारीला सुरुवात केली.
‘सँडल वुड ड्रग्ज’ प्रकरणातील आरोपी आदित्य अल्वा सध्या फरार आहे. आदित्य अल्वा हा विवेक ओबेरॉयच्या पत्नीचा भाऊ आहे. त्यामुळे आदित्य विवेकच्या घरात लपला असल्याची माहिती मिळाल्यानंतर विवेक ओबेरॉय याच्या घरी धाड टाकण्यात आली.
कर्नाटकचे माजी मंत्री जीवाराज अल्वा यांचा मुलगा आदित्य अल्वा याचा अमली पदार्थ प्रकरणात बेंगळूर पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणात कन्नड सिनेसृष्टीतील गायक, कलाकार यांचे कनेक्शन समोर आले.
बेंगळूरचे पोलीस अधिकारी संदीप पाटील यांनी सांगितले की, आदित्य अल्वा फरार असून, पोलीस कसोशीने त्याला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. विवेक ओबेरॉय त्याचा नातेवाईक असल्याने तो सध्या विवेकच्या घरी लपून बसल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यामुळे कोर्टाकडून वॉरंट घेऊन, क्राईम ब्रांच ची टीम बेंगळूरवरून मुंबईत पोहोचली आहे.