बेंगळूर/प्रतिनिधी
सीरा विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार टी. बी. जयचंद्र यांनी गुरुवारी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. जयचंद्र यांनी कर्नाटकचे कॉंग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्यासमवेत सिरा येथील रिटर्निंग ऑफिसर यांना उमेदवारी अर्ज सादर केला.
ऑगस्टमध्ये जद (एस) चे आमदार बी. सत्यनारायण यांच्या निधनानंतर सीरा मतदार संघाची जागा रिक्त होती. सीरासह आर. आर. नगर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.
टी. बी. जयचंद्र यांनी २०१८ मध्ये जेडीएसला जागा दिली होती. २०१३ मध्ये सीरा मतदारसंघातून विजय मिळविला होता. जयचंद्र यांनी एस.एम. कृष्णा आणि सिद्धरामय्या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम पाहिले होते. यापूर्वी त्यांनी सहा विधानसभा निवडणुका जिंकल्या असून १९७८ मध्ये ते प्रथम विधानसभेवर निवडून आले होते.