ऑनलाईन टीम / पुणे :
चतुःशृंगी देवीच्या मंदिरात शासनाने जाहीर केलेल्या सर्व नियमांचे पालन करून या वर्षीचा नवरात्रौत्सव 17 ते 25 ऑक्टोबर या कालावधीत साधेपणाने साजरा केला जाणार आहे.
शासनाच्या नियमांनुसार भाविकांना दर्शनासाठी मंदिराच्या आवारात प्रवेश दिला जाणार नाही. मात्र ऑनलाइन पद्धतीने देवीच्या दर्शनाची व्यवस्था केली जाणार आहे. अशी माहिती ‘श्री देवी चतुःश्रृंगी मंदिर ट्रस्ट’चे अध्यक्ष किरण अनगळ आणि कार्यकारी विश्वस्त देवेंद्र अनगळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
नवरात्रौत्सवातील सर्व धार्मिक कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरे केले जाणार आहेत. येत्या शनिवारी (17 ऑक्टोबर) सकाळी 9 वाजता देवीचा अभिषेक, षोडशोपचार पद्धतीने महापूजा व महावस्त्र अर्पण करून मंदिरात घटस्थापना करण्यात येणार आहे. नारायणशास्त्री कानडे गुरुजी आणि श्रीरामशास्त्री कानडे गुरुजी पौरोहित्य करणार आहेत. नरेंद्र अनगळ यांच्याकडे या वर्षीच्या पूजेची जबाबदारी आहे.
देवीची आरती दररोज सकाळी 10 वाजता आणि रात्री साडेआठ वाजता करण्यात येणार आहे. रविवारी (25 ऑक्टोबर) सकाळी 8 ते 11 या वेळेत नवचंडी होम करण्यात येणार आहे. त्याच दिवशी दुपारी विजयादशमीनिमित्त देवस्थानचे कर्मचारी आणि पुजारी यांच्या उपस्थितीत मंदिराच्या परिसरात सीमोल्लंघन करण्यात येणार आहे.
देवीचे दर्शनआणि सर्व धार्मिक सोहळ्यांचे थेट प्रक्षेपण www.chattushringidevasthanpune.org आणि www.chattushringidevasthan.org या संकेतस्थळांवर पाहाता येणार आहे. भाविकांसाठी देवस्थानच्या फेसबूक पेजवर आणि यूट्यूबवर दर्शनाची सोय करण्यात आलेली आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर थेट दर्शनासाठी एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहे. भाविकांना देणगी देण्यासाठी विशेष ऍपद्वारे डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.