आम आदमी पक्षाचा आरोप
प्रतिनिधी / पणजी
आरोग्यमंत्री विश्वजित राणे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यामधील दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यांच्यामधील समन्वयाच्या अभावामुळे कोविड महामारीच्या काळात बरेच नुकसान झालेले आहे. पायाभूत सुविधा पुरविण्यात या अंतर्गत संघर्षामुळे अपयश आल्याने त्याचे दुष्परिणाम गोव्यातील जनतेला भोगावे लागत आहेत. असा आरोप आम आदमी पक्षाचे नेते सुरेल तिळवे यांनी केला.
मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्यामधील खोलवर दरी झालेली सर्व गोवेकर गेली काही वर्षे अनुभवत आहेत. कोविड महामारीनंतर ही धुसफूस अधिक प्रकर्षाने जाणवत आहे. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री दररोज पत्रकार परिषद घेऊन आरोग्य बुलेटिनवर स्पष्टीकरण देत होते. आरोग्यमंत्री राणे यांनी दिलेले आकडे आणि मुख्यमंत्री सावंत यांच्याकडून मिळणारी आकडेवारी यांच्यामध्ये नेहमीच तफावत असलेली पाहायला मिळत होती. घरी क्वारंटाईन केलेल्या होम आयसोलेशन रुग्णांच्याबाबतीत सलग 15 दिवस चुकीची माहिती आरोग्य बुलेटिनमध्ये प्रसिद्ध होत होती यामुळे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्यामध्ये असलेला समन्वयाचा अभाव किती खोलवर आणि गंभीर आहे याचा अनुभव आला. त्या दोघांमधील वैयक्तिक मतभेद आणि राजकीय महत्वाकांक्षा यांची किंमत सर्वसामान्य गोवेकरांना चुकवावी लागत आहे. असे तिळवे यांनी पुढे सांगितले.
विश्वजित राणे हे मुख्यमंत्री होण्यासाठी बरेच महत्वाकांक्षी होते तसेच सरकार उलथवून टाकण्याविषयीच्या बातम्यांमध्येही त्यांचे नाव झळकले होते. 2019 साली राणे यांचे एका पत्रकाराबरोबर झालेले संभाषण सर्व बातम्यांमध्ये प्रसिद्ध होऊन बरेच गाजले होते ज्यामध्ये राणे हे सरकार उलथवून टाकण्याविषयी बोलत असलेले स्पष्ट ऐकायला मिळते. मनोहर पर्रीकर यांच्या मृत्यूनंतर आपणच मुख्यमंत्री होऊ अशी पक्की खात्री विश्वजित यांना होती पण अचानक प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्री म्हणून सूत्रे हातात घेतली होती आणि विश्वजित यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरल्यासारखे झाले होते. असेही तिळवे यांनी सांगितले.
खासगी हॉस्पिटलमधील कोविड उपचारासाठी दीन दयाल स्वास्थ्य सेवा योजना याचा समावेश गोवेकरांच्यादृष्टीने एक स्वागतार्ह बाब होती. मुख्यमंत्री सावंत आणि आरोग्यमंत्री राणे यांच्यामधील अहंकार आणि वैयक्तिक हेवेदावे यांच्यामुळे ती योजना रद्द करण्यात आली आहे. हा काळ फारच कठीण आहे त्यामुळे मुख्यमंत्री सावंत आणि आरोग्यमंत्री राणे यांनी अहंकार बाजूला ठेवून लोकांच्या भल्यासाठी एकत्र येऊन काम केले पाहिजे. त्यांच्यामधील मतभेद गोमंतकीयांच्या आयुष्यासाठी घातक ठरत आहेत. या जीवघेण्या कोविडमुळे 500 लोकांनी आपले आयुष्य गमावलेले आहे. त्यामुळे गोव्यातील लोकांच्या वतीने आम्ही त्या दोघांना विनंती करू इच्छितो की त्यांनी गोव्याच्या लोकांसाठी काम करावे असे सुरेल तिळवे यादरम्यान म्हणाले.









