सिंगापूरमध्ये कोरोना महामारीदरम्यान मुलांना जन्म देणाऱया पालकांना सिंगापूरमध्ये आर्थिक पुरस्कार दिला जात आहे. महामारीदरम्यान लोकांना मुलांना जन्म देण्याकरता प्रोत्साहित करण्यासाठी सरकार आर्थिक लाभाचा प्रस्ताव देत आहे.
कोरोनामुळे सर्वसामान्य लोक नोकरकपातीमुळे आर्थिक तणावाला सामोरे जात असून यातून ते कुटुंब वाढविण्यास घाबरत आहेत. ही चिंता आणि तणाव दूर करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलण्याचा विचार केला आहे. दिल्या जाणाऱया रकमेचा तपशील अद्याप उघड करण्यात आलेला नाही. हा प्रोत्साहननिधी सरकारकडून दिल्या जाणाऱया अनेक छोटय़ा बेबी बोनसच्या अतिरिक्त असणार आहे.
सर्वात कमी जन्मदर

जगात सर्वात कमी जन्मदर सिंगापूरमध्येच आहे. सिंगापूरचे सरकार अनेक वर्षांपासून हा दर वाढविण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. सिंगापूर स्वतःचे शेजारी इंडोनेशिया आणि फिलिपाईन्स यांच्यापेक्षा खूपच वेगळा देश आहे. या देशांमध्ये कोरोना लॉकडाउनदरम्यान गर्भधारणेत मोठी वृद्धी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोविड-19 मुळे मुलांसाठी प्रयत्नशील काही दांपत्य स्वतःची ही योजना स्थगित करत असल्याचे ऐकू आल्याचे सिंगापूरचे उपपंतप्रधान हेंग स्वी कीट यांनी म्हटले आहे. प्रोत्साहननिधीची माहिती आणि देयकाच्या प्रक्रियेसंबंधी लवकरच घोषणा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
वर्तमान बेबी बोनस प्रणाली
सिंगापूरच्या वर्तमान बेबी बोनस प्रणालीत आईवडिलांना 10,000 सिंगापूरच्या चलनापर्यंत (जवळपास 5.50 लाख रुपये) प्रदान केले जाते. शासकीय आकडेवारीनुसार सिंगापूरमध्ये प्रजनन दर 2018 मध्ये 8 वर्षांच्या नीचांकी स्तरावर पोहोचला होता. हा दर प्रतिमहिला 1.14 इतका आहे. प्रजनन दरातील घसरण अनेक आशियाई देशांमध्ये एक मोठा मुद्दा आहे. महामारीदरम्यान हा दर आणखीनच कमी होऊ शकतो. चीनमध्येही चालू वर्षाच्या प्रारंभी त्याच्या स्थापनेच्या 70 वर्षांनी प्रजनन दर सर्वात कमी झाला होता. मुलांशी संबंधित धोरणांमुळे हा दर कमी झाल्याने त्यात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.









