ऑनलाईन टीम / पुणे :
आपल्या हजारो वर्षांच्या वैभवशाली इतिहासाच्या परंपरेत अनेक विविधता निर्माण झाल्या. त्या सगळ्या विविधतांचं एकतेतं केलेलं समन्वित, संवादी आणि समरस असं संकलन म्हणजे हिंदू समाज म्हणजेच आजचा भारत देश आहे. हा हिंदू समाज घडण्याची प्रक्रिया ज्या काळात पूर्णत्वाला गेली तो हा (५ वे शतक ते १२ वे शतक) काळ आहे. आपला उज्वल इतिहास जगाला सांगणे आवश्यक आहे. आपल्या प्रगतीसाठी तो जाणून घेणे देखील तितकाच गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
सुधा रिसबूड लिखित व कॉटिंनेन्टल प्रकाशित ‘अजेय भारत’ (५ शतक ते १२ वे शतक – भारतीय इतिहासाचा दैदीप्यमान कालखंड) या पुस्तकाचे प्रकाशन सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झाले. प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी नॅशनल मेरिटाईम हेरिटेज कॉम्पलेक्सचे डायरेक्टर जनरल व ज्येष्ठ पुरातत्व संशोधक डॉ. वसंत शिंदे होते. व्यासपीठावर लेखिका सुधा रिसबूड व कॉटिंनेन्टल प्रकाशनच्या देवयानी अभ्यंकर या उपस्थिती होत्या.
यावेळी बोलताना डॉ. भागवत म्हणाले, भारत देशात शासननिरपेक्ष स्वतंत्र अशी व्यवस्था आहे, ती मोडून काढल्याशिवाय या देशावर राज्य करणे सोपे नाही. ही गोष्ट ज्यावेळी ब्रिटीशांच्या लक्षात आली त्यावेळी त्यांनी आपला गौरवशाली इतिहास मोडून सांगायला व शिकवायला सुरूवात केली. आपली वैभवशाली परंपरा, वस्तुस्थिती सांगणारे पुरावे दडपले. जे पुरावे उपलब्ध होते त्यांचे विकृत विश्लेषण केले गेले. विदेशींच्या मदतीने काही विद्वानांनी जाणीवपूर्वक बिघडवलेला हा दृष्टीकोन स्वातंत्र्यानंतर ही सुधारण्याची संधी होती. मात्र, दुर्दैवाने ही सुधारणा होता कामा नये, हे नियोजनपूर्वक पाहिले गेले.
आमच्या येथे इतिहासाची मांडणी करताना निष्कर्ष आधी मांडला जातो. त्यानुसार सोयीचे पुरावे, संदर्भ समोर ठेवले जातात. पण जे सत्य आहे, दिसतं आहे अशी कोणतीही गोष्ट मान्य केली जात नाही. राखीगढीमध्ये हडप्पन संस्कृती संबंधाने झालेले संशोधन त्याचे एक चांगले उदाहरण म्हणून पाहता येईल, असेही भागवत म्हणाले.








