राज्य निवडणूक आयोगाचे सरकारला पत्र : लवकर निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना
प्रतिनिधी/ बेंगळूर
उच्च न्यायालयाने निवडणुका घेण्यास संमती दर्शविल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी राज्य सरकारला पत्र पाठवून डिसेंबर 2020 पूर्वी ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना दिली आहे. त्यामुळे कोरोना परिस्थितीत देखील राज्य सरकारला निवडणुका घेण्याबाबत सकारात्मक हालचाली कराव्या लागणार आहेत.
राज्यातील दोन विधानसभा मतदारसंघात आणि विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार ग्रामपंचायतींसाठी देखील सर्व प्रकारची खबरदारी उपाययोजना आणि सुरक्षा व्यवस्था करून करून लवकर निवडणूक घेणे अनिवार्य असल्याचा उल्लेख आयोगाने राज्य सरकारला पाठविलेल्या पत्रामध्ये केला आहे. ग्रामविकास आणि पंचायतराज खात्याच्या मुख्य सचिवांना आयोगाने पाठविलेल्या पत्रात निवडणूक आयोगाने ग्रा. पं निवडणूक घेण्यासाठी तयारी पूर्ण केली आहे. राज्यात पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी स्वतंत्र मार्गसूची जारी केली आहे. अशीच मार्गसूची जारी करून ग्रा. पं. निवडणुका घेण्यासाठी तयारी करण्यात आली आहे, असे स्पष्ट केले आहे.
राज्य सरकारने 50 नव्या तालुक्यांची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर तालुका आणि जिल्हा पंचायतींची पुनर्रचना आणि आरक्षण ठरविण्याची प्रक्रिया डिसेंबरपूर्वी पूर्ण करावी, अशी सूचनाही आयोगाने सरकारला दिली आहे.
निवडणुकीचे संभाव्य वेळापत्रक उच्च न्यायालयात सादर
राज्यातील 6,025 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ जून, जुलै महिन्यातच संपुष्टात आला आहे. कोरोना परिस्थितीमुळे या पंचायतींच्या निवडणुका अद्याप होऊ शकलेल्या नाहीत. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचे संभाव्य वेळापत्रक तयार केले असून मंगळवारी ते उच्च न्यायालयाकडे सादर केले आहे.
कार्यकाळ संपलेल्या ग्रा. पं. साठी निवडणूक घ्यावी, असे निर्देश निवडणूक आयोग आणि राज्य सरकारला द्यावेत, अशी जनहित याचिका काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य के. सी. कोंडय्या व इतरांनी दाखल केली होती. याचिकांवर मुख्य न्यायाधीश अभय ओक यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने निवडणूक आयोगाकडून मत मागविले होते. त्यानुसार आयोगाने निवडणुकीचे संभाव्य वेळापत्रक तयार असल्याचे सांगितले. तसेच बंद लखोटय़ात उच्च न्यायालयाकडे ग्रा. पं. निवडणुकीचे संभाव्य वेळापत्रक सादर केले.
राज्यातील दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये तर विधानपरिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक होत आहे. ही निवडणूक प्रक्रिया, आचारसंहिता संपल्यानंतर ग्रा. पं. साठी निवडणुका घेण्यात येणार असल्याचे समजते. कोरोना परिस्थिती विचारात घेऊन निवडणुका घेण्यास सांगून न्यायालयाने सुनावणी 16 ऑक्टोबरपर्यंत लांबणीवर टाकली.









