आघाडी धर्मातच बिघाडी नको
प्रतिनिधी / सांगली
राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षाची आघाडी आहे. या आघडीमध्ये कोणत्याही प्रकारची बिघाडी नको आहे. पण जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून सुरू असलेला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा अत्यंत चुकीचा झाला आहे, असे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
आमदार कदम म्हणाले, राज्यात हे तिन्ही पक्ष ज्यावेळी एकत्रित आले त्यावेळी एकमेकांचे कार्यकर्ते कोणत्याही परिस्थितीत फोडायचे नाहीत असा निर्णय झाला होता असे असतानाही जिल्ह्यात काही दिवसापुर्वी सांगली बाजारसमितीतील काँग्रेसचे संचालक व जिल्ह्यातील इतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश दिला आहे. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला स्वतः राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उपस्थित होते. त्यामुळे आघाडी धर्मात त्यांच्याकडूनच बिघाडी होत असल्याची टिकाही आमदार कदम यांनी केली.
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी आघाडी करताना काही नियमावली तयार केली आहे. या नियमावलीचे पालन तीन्ही पक्षांनी करणे गरजेचे आहे. या नियमावलीला धुडकावून कामकाज करणे चुकीचे आहे. आपआपल्याच सहकारी आणि घटक पक्षातील कार्यकर्ते फोडणे हे कितपत बरोबर आहे असा सवालही त्यांनी केला. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, युवा नेते जितेश कदम यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.








