यू-टय़ुब प्री-रेकॉर्डेड व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी सोय
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी घेत ऑनलाईन तासिका सुरू करण्यात आल्या आहेत. अनुदानित-विनाअनुदानित महाविद्यालयांनी व्यवस्थापकीय स्तरावर शिक्षणाची गंगा सुरूच ठेवली आहे. पदवीपूर्व शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सोयीस्कर शैक्षणिक वाटचालीच्यादृष्टीने यू-टय़ुब प्री-रेकॉर्डेड व्हिडिओच्या माध्यमातून बारावीबरोबरच अकरावीच्या शैक्षणिक वाटचालीची सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना लिंकच्या माध्यमातून व्हिडिओ पाहून अभ्यास करणे सोपे जाणार आहे.
महाविद्यालयीन शैक्षणिक वर्षाला प्रामुख्याने मे-जून महिन्यात प्रारंभ होतो. मात्र, यंदा कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयीन शैक्षणिक प्रणालीही बदलून गेली. बारावीचे वर्ग ऑनलाईन सुरू करण्याचा निर्णय घेत अँड्रॉईड मोबाईलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाठय़क्रमाची लिंक पाठवून अभ्यास करवून घेतला जात आहे. दहावीच्या निकालानंतर अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र, दरवर्षीप्रमाणे महाविद्यालयाचा पहिला दिवस विद्यार्थ्यांना अनुभवताच आला नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी अकरावीचे ऑनलाईन क्लासेस सुरू करण्यात आले आहेत.
पदवीपूर्व शिक्षण खात्याद्वारे कला, वाणिज्य आणि विज्ञान विभागात शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांसाठी विषयनिहाय, पाठय़निहाय अभ्यासक्रमांचे विषयतज्ञांकडून तासिकांचे व्हिडिओ करण्यात आले आहेत. हे प्री-रेकॉर्डेड व्हिडिओ यू-टय़ुबवर ऑनलाईन लिंकवर अपलोड करण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना या लिंकद्वारे आपला विषय अभ्यासता येणार आहे. महाविद्यालयीन स्तरावर संबंधित विद्यार्थ्यांना याची माहिती देण्यात येणार आहे.









