दुरुस्ती करताना बिघाड : लोकलसेवा, ऑनलाईन परीक्षा आणि रुग्णालयांवर मोठा परिणाम
प्रतिनिधी / मुंबई
घडय़ाळाच्या काटय़ावर धावणारा मुंबईतील वीजपुरवठा सोमवारी सकाळी अचानकपणे खंडित झाल्याने मुंबईसह उपनगरे ठप्प झाली. आर्थिक राजधानीतील कार्यालये, लोकलसेवा,
ऑनलाईन परीक्षा आणि रुग्णालयांवर मोठा परिणाम झाला. अखेर तीन तासांनंतर मुंबईतील वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरू झाल्यानंतर मुंबईकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. महापारेषणच्या 400 केव्हीच्या कळवा आणि पडघा जीआयएस पेंद्रात सर्किट 1 ची देखभाल-दुरुस्ती सुरू असताना सर्व भार सर्किट 2 वर होता. सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई महानगर प्रदेशातील बहुतांश भागांमध्ये बत्तीगुल झाली.
महावितरण, अदानी, बेस्ट, टाटा अशा सर्वच वीज वितरकांच्या सेवेला या ग्रीड फेल्युरचा फटका बसला. कल्याण-मीरा भाईंदर ते थेट
कुलाबापर्यंतच्या परिसरातील व्यवसाय, उद्योगपेंद्रे आणि ऑनलाईन व्यवहारांवर परिणाम झाला. सकाळी दहाच्या सुमारास लालबाग, परळ, अंधेरी, दादर, ठाणे, वडाळा या भागात तर कालांतराने उपनगरातील वीज खंडित झाली. लोकल गाडय़ा जागच्या जागी थबकल्या. पहिल्यांदा काहीच समजण्यास मार्ग नसल्याने बहुतांश प्रवाशांनी बस, एसटी तसेच रिक्षा टॅक्सीचा पर्याय
निवडला.
मात्र तोपर्यंत रिक्षा, टॅक्सीच्या शेअर भाडय़ासाठी दुपटीचा दाम मोजावा लागला. मुंबई
महापालिका क्षेत्रासह ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर, वसई-विरार, पनवेल या क्षेत्रातही वीजपुरवठा खंडित झाला होता.
जनरेटरची सुविधा उपलब्ध खंडित वीजपुरवठय़ामुळे व्हेंटिलेटर, एक्सरे सारख्या सेवांवर विपरीत परिणाम झाला. मात्र रुग्णालयांमध्ये जनरेटरची सुविधा असल्याचे मुंबई पालिका रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. सध्या मोठय़ा शस्त्रक्रिया होत नसल्याने येथील सेवा सुरळीत सुरू होती, असे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले. रेल्वे, दवाखाने, पाणीपुरवठा अशा सर्वच सुविधा ठप्प पडल्या होत्या.