श्रीनगर : श्रीनगरमध्ये बारा तासांहून अधिक वेळ चाललेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी सोमवारी लष्कर-ए-तोयबाच्या मुख्य कमांडरसह दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या चकमकीमुळे श्रीनगरला दहशतवाद्यांपासून मुक्त केल्याचा पोलिसांचा दावा फोल ठरला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये सुरक्षा दलांनी अनेकवेळा श्रीनगरला दहशतवादमुक्त असल्याचा दावा केला होता. मात्र, रविवारी येथे शोधमोहीम व चकमक सुरू होती. या चकमकीत सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर सैफुल्लासह एका स्थानिक दहशतवाद्याला ठार केले. पोलीस सैफुल्लाचा शोध घेत होते. त्याचा खात्मा करणे हा सुरक्षा दलांचा मोठा विजय मानला जात आहे.
सुरक्षा दलाने दोन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. चकमकीच्या ठिकाणी शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. सखोल शोधमोहीम राबविल्यानंतर सुरक्षा दलाने ही कारवाई संपविण्याची घोषणा सोमवारी दुपारी केली.
पाकिस्तानी दहशतवादी सैफुल्लाने यावषी काश्मीरमध्ये घुसखोरी केली. सुरुवातीच्या काळात तो उत्तर काश्मीरमध्ये कार्यरत होता. पण गेल्या दोन महिन्यांपासून त्याने दक्षिण काश्मीरमध्ये बस्तान बसवत अनेक दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले होते. गेल्या 24 सप्टेंबरला सैफुल्लाने सीआरपीएफ जवानांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचा जवान हुतात्मा झाला होता. याशिवाय कांदिजल पामपोर येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दुसऱया हल्ल्यातही त्याचा सहभाग होता.