नुरबर्गरिंग, जर्मनी : मर्सिडीजचा ड्रायव्हर लेविस हॅमिल्टनने येथे झालेल्या आयफेल ग्रां प्रि फॉर्मुला वन शर्यतीचे जेतेपद पटकावत माजी ड्रायव्हर मायकेल शुमाकरच्या 91 जेतेपद मिळविण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. तो आता सातव्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिप मिळविण्याच्या समीप पोहोचला आहे. रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनने दुसरे, रेनॉच्या डॅनियल रिकार्दोने तिसरे स्थान मिळविले. हॅमिल्टनने येथे जेतेपद मिळविले असले तरी त्याचा संघसहकारी व्हाल्टेरी बोटासला अर्ध्यावरच निवृत्त व्हावे लागल्याने जेतेपद मिळविण्याच्या त्याच्या आशेला धक्का बसला. हॅमिल्टनने या मोसमातील सातवे जेतेपद मिळविले असून बोटासपेक्षा तो तब्बल 69 गुणांनी पुढे आहे. या मोसमातील केवळ तीन शर्यती बाकी राहिल्या आहेत. दुसरे स्थान मिळविणाऱया व्हर्स्टापेनने सर्वात जलद लॅप नेंदवत एक बोनस गुणही मिळविला. बोटासने पोल पोझिशनवरून सुरुवात केली होती. पण त्याच्या गाडीच्या स्टीअरिंग व्हीलमध्ये समस्या निर्माण झाल्याने 13 व्या लॅपवेळी त्याला निवृत्त होणे भाग पडले.
रेसिंग पॉईंटच्या सर्जिओ पेरेझने चौथे, मॅक्लारेनच्या कार्लोस सेन्झने पाचवे, अल्फा टॉरीच्या पीयर गॅसलीने सहावे, फेरारीच्या चार्लस लेसलर्कने सातवे, रेसिंग पॉईंटच्या निको हल्केनबर्गने आठवे, हासच्या ग्रोस्जाँने नववे, अल्फा रोमिओच्या अँटोनिओ गोविनाझीने दहावे स्थान मिळविले.
त्याचा संघसहकारी किमी रायकोनेनला बाराव्या स्थानावर समाधान मानावे लागले.