ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या मागणीला प्रोत्साहन देण्यासाठी स्पेशल फेस्टिव्हल ॲडव्हान्स आणि प्रवास रजा भत्ता (एलटीसी) कॅश व्हाउचर योजना जाहीर केली.
जीएसटी परिषदेच्या 43 व्या बैठकीपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. कोरोनाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. हे लक्षात घेऊन बाजारातील मागणी वाढवण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांनी स्पेशल फेस्टिव्हल ॲडव्हान्स आणि प्रवासभत्ता कॅश व्हाउचर योजना जाहीर केली.
स्पेशल फेस्टिव्हल ॲडव्हान्स ही योजना पुढील सहा महिने उपलब्ध असून, केंद्र सरकार आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना 10,000 रुपयांचा विशेष ॲडव्हान्स देणार आहे. ही रक्कम 31 मार्च 2021 पर्यंत खर्च करावी लागेल. प्रीपेड रुपे कार्ड म्हणून ते दिले जाईल आणि कर्मचारी ते 10 हप्त्यांमध्ये जमा करू शकतात. या योजनेसाठी सरकारला 4000 कोटी रुपये खर्च येणार आहे.
तर प्रवास रजा भत्ता (एलटीसी) रोख योजनेअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्याला कॅश व्हाउचर मिळेल. जेणेकरून तो खर्च करू शकेल. या योजनेचा पीएसयू आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कर्मचाऱ्यांनाही फायदा होणार आहे. एलटीसीसाठी रोख रकमेवर सरकारचा खर्च 5675 कोटी रुपये असेल.









