अनगोळ येथील घटना : पाच जणांवर एफआयआर
प्रतिनिधी/ बेळगाव
यापूर्वी झालेल्या वादावादीतून घरात घुसून एका तरुणावर तलवार हल्ला करण्यात आला आहे. शनिवारी मध्यरात्री रघुनाथ पेठ, अनगोळ येथे ही घटना घडली असून त्याच परिसरातील पाच तरुणांवर टिळकवाडी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
चेतन अरुण सायनाक (वय 28) रा. रघुनाथ पेठ, अनगोळ असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याच्या डोक्मयावर तलवारीने वार करण्यात आले आहेत. खासगी इस्पितळात त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. चेतनने दिलेल्या फिर्यादीवरून भा.दं.वि. 143, 147, 148, 307, 504, 506 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
विनायक पाटील, अमित बेर्डे, मारुती हुंदरे, कौशिक पाटील, संकेत सुरुतेकर या पाच तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून एफआयआर दाखल करून पोलिसांनी तपास हाती घेतला आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक विनायक बडिगेर व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
उपलब्ध माहितीवरून अनगोळ येथील मरगाई यात्रेच्या वेळी दोन गटात वादावादी व भांडणाचा प्रकार घडला होता. तेव्हापासून हा वाद धुमसत होता. शनिवारी मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास या पाच जणांनी चेतनच्या घरात घुसून त्याच्यावर तलवारीने हल्ला केला आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.









