ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशात ‘स्वामित्व’ योजनेला सुरुवात केली. आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत ही योजना राबविण्यात येणार असून, लाभार्थी नागरिकांना ‘संपत्ती कार्ड’ देण्यात येणार आहे.
एक कायदेशीर दस्तावेज म्हणून ‘संपत्ती कार्ड’चा वापर करता येणार आहे. या योजनेत दिल्या जाणाऱ्या संपत्तीच्या मालकीच्या कार्डमुळे बँकेतून कर्ज घेणे किंवा इतर कामांसाठी त्या कार्डचा उपयोग केला जाऊ शकतो. विकसनशील देशांच्या दृष्टीने हे कार्ड महत्वाचे आहे. या योजनेमुळे ग्राम पंचायतींचेही व्यवस्थापन होईल.
6 राज्याच्या 763 गावातील गावकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील 346, हरियाणा 221, महाराष्ट्रातील 100, मध्यप्रदेशातील44, उत्तराखंडच्या 50 आणि कर्नाटकातील 2 गावांचा समावेश आहे.
संपत्ती कार्डमुळे बँकांकडून कर्ज मिळून रोजगार आणि स्वयंरोजगाराचे मार्गही निर्माण होतात. 24 एप्रिल 2020 ला मोदींनी या योजनेची घोषणा केली होती. त्या योजनेला आजपासून सुरुवात झाली. लाभार्थ्यांना आपल्या मोबाईलवर एसएमएसद्वारे ही लिंक मिळणार आहे. त्याद्वारे ते ‘संपत्ती कार्ड’ डाऊनलोड करू शकतात.









