सातारा एलसीबी, तालुका डीबीची कामगिरी
प्रतिनिधी/ सातारा
राष्ट्रीय महामार्गावर लिंबफाटा (ता. सातारा) नजीक गौरीशंकर कॉलेज समोर सर्विस रस्त्यावर एका चारचाकी वाहन चालकाकडून त्याचा मोबाईल जबरदस्तीने चोरून नेणाऱया दोन चोरटय़ांना जेरबंद केले आहे. सातारा स्थानिक गुन्हे शाखा व सातारा तालुका डीबीच्या पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली.
पोलिसांनी या प्रकरणी सचिन दिलीप जमदाडे व वैभव संजय पवार (दोघे रा. लिंब ता. सातारा) यांना अटक केली आहे. त्याने चोरलेला मोबाईल व गुन्हयात वापरलेली मोटारसायकल असा एकूण 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी , दि. 8 रोजी लिंब ता.सातारा गावच्या हद्दीत गौरीशंकर कॉलेजजवळ हायवेवर महालक्ष्मी पॉलिटेक्नीकलमध्ये कोव्हिड सेंटरमध्ये औषधे पुरवण्याचे काम करत असलेल्या चारचाकी वाहनावरील विश्वजित शंकर फरांदे (रा. आनेवाडी ता. जावली) या चालकास अनोळखी दोन युवकांनी मोटारसायकल आडवी मारून अडवले. वाहन चालविण्याचा परवाना आहे का, गाडीत माल काय आहे असे विचारण्याचा बहाणा करत वाहनचालकास मारहाण करून त्याचा मोबाईल घेवून चोरटे पळून गेले होते.
रात्री विश्वजित फरांदे याने सातारा तालुका पोलीस ठाण्या तक्रार दिली होती.
प्रकार गंभीर असल्याने वरिष्ठांनी तातडीने तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक सजन हंकारे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा डी.बी. पथक व स्थागुशा सातारा यांनी संशयितांची शोध मोहिम राबवली.
काही संशयितांना ताब्यात घेवून अधिक माहिती प्राप्त केली. त्यामध्ये एका संशयिताकडे कौशल्यपूर्वक विचारपूस केली असता त्याने सदर गुन्हयाची कबुली दिली आहे. गुन्हा घडल्यापासून अवघ्या 24 तासाचे आत अनोळखी आरोपींचा सातारा डी.बी. पथक व स्थागुशा सातारा यांचे पथकाने संयुक्त कामगिरी करून आरोपींचा शोध घेवून सदरचा गंभीर गुन्हा उघड केलेने वरीष्ठ अधिकारी यांनी दोन्ही पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचार्याचे अभिनंदन केले आहे.
या कारवाईत तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रसन्न जराड, डी.बी. पथकातील हवालदार दादा परिहार, पोलीस नाईक शरद बेबले, प्रविण फडतरे, सुजीत भोसले, निलेश काटकर, कॉन्स्टेबल सागर निकम, सतीश पवार, नितीराज थोरात,विशाल पवार यांनी सहभाग घेतला.









