महाराष्ट्र वन्य जीव मंडळाचा प्रकल्प : अरब सागरात फक्त 250 हंपबॅक व्हेल : सहा कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे
संदीप बोडवे / देवबाग:
संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि त्याच्या लगतच्या भारतीय सागरी जल क्षेत्रातील ‘अरेबियन सी हंपबॅक व्हेल’ च्या पुनरुज्जीवनाचा महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यासाठी नोव्हेंबर 2020 ते ऑक्टोबर 2025 असा पाच वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. राज्याच्या वन्य जीव मंडळाने यासाठी सहा कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला असून तो केंद्राच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.
भारताचा पश्चिम किनारा हा ‘तटीय’ आणि ‘समुद्री सिटेशियन’ या दोन्ही प्रजातींसाठी महत्त्वपूर्ण अधिवास मानला जात आहे. परंतु या भागातील सस्तन (सिटेशियन) प्रजातींचा सखोल अभ्यास अद्याप झालेला नाही. किनाऱयांवरील ओडोन्टोसेट (इंडियन ओशन हंपबॅक डॉल्फिन आणि इंडो – पॅसिफिक फिनलेस पोरपॉईसेस) या प्रजातींचे एका प्रकल्पाचा भाग म्हणून पद्धतशीरपणे सर्वेक्षण सुरू झाले आहे. परंतु बलीन व्हेलबाबत अद्याप मर्यादित डाटा उपलब्ध आहे.
हंपबॅक व्हेल धोकादायक सूचित
बलीन व्हेलच्या ब्राईडस् व्हेल, ब्लू व्हेल आणि हंपबॅक व्हेल या तीन प्रजाती भारताच्या पश्चिम किनाऱयावरून नोंदविल्या गेल्या आहेत. यापैकी ब्राईडस् व्हेल आणि ब्लू व्हेल या प्रजाती तुलनेने सामान्य असून त्यांचे किनाऱयाजवळील पाण्यात दर्शन झाले आहे. परंतु हंपबॅक व्हेलबाबत अतिशय कमी माहिती उपलब्ध आहे. भारताच्या पश्चिम किनाऱयावर जवळ आढळणारे हंपबॅक व्हेल ही अरबी समुद्रातील एक वैशिष्टय़पूर्ण दुर्मिळ प्रजाती आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्सर्वेशन ऑफ नेचर (आय यू सी एन) च्या रेड लिस्टनुसार अरेबियन सी हंपबॅक व्हेल सध्या ‘धोकादायक’ वर्गात समाविष्ट आहे. अलीकडील एका अभ्यासानुसार बहुधा अरबी समुद्रामध्ये 250 पेक्षा कमी असलेल्या या प्रजातीच्या प्रौढ व्हेलचा आढळ असल्याचे समजून आले आहे.
कोकण सिटेशियन रिसर्च टीमकडून अभ्यास
महाराष्ट्र वन्यजीव मंडळाने कोकण सिटेशियन रिसर्च टीम (केसीआरटी) च्या संशोधकांशी सल्लामसलत करून हंपबॅक व्हेलच्या पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव तयार केला आहे. केसीआरटी 2014 पासून महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील सिटेशियन्सचा अभ्यास करीत आहे. या टीमने 2014-2015 मध्ये सिंधुदुर्गच्या सागरी क्षेत्रात खास करून इंडो पॅसिफिक हंपबॅक डॉल्फिन व फिलनेस पॉरपॉईज या दोन सिटेशियन प्रजातींचा यूएनडीपीच्या प्रकल्पा अंतर्गत अभ्यास केला होता.
वैशिष्टय़पूर्ण दुर्मिळ प्रजातीचे पुनरुज्जीवन – मांजरेकर
कांदळवन प्रतिष्ठानचे उप संचालक (संशोधन व क्षमता बांधणी) मानस मांजरेकर म्हणाले, केंद्र शासनाने अती धोकादायक श्रेणीतील प्रजातींच्या पुनरुज्जीवनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत गुजरातपासून केरळपर्यंतच्या सर्व पश्चिम किनारपट्टीवरील राज्यांकडून हंपबॅक व्हेलच्या पुनरुज्जीवनाबाबत प्रस्ताव मागितला गेला आहे. भारतामध्ये या प्रजातींचा विशेष अभ्यास झालेला नाही. परंतु किनाऱयांवर मृतावस्थेत हंपबॅक व्हेल सापडल्याच्या दुर्मिळ नोंदी आहेत. जो काही अभ्यास झाला आहे, तो फक्त अरबी समुद्राच्या पश्चिम किनाऱयावरील ओमानसारख्या देशात थोडय़ा फार प्रमाणात झाला आहे. हंपबॅक व्हेल ही देवमाशाची एक प्रजाती आहे. अरबी समुद्रात आढळणाऱया या प्रजातीच्या अरेबियन सी हंपबॅक व्हेल असे म्हटले जाते. ही प्रजाती अन्य महासागरांत स्थलांतर करीत नसल्याचे मानले जाते.
दुर्मिळ अधिवासाचा अभ्यास दिशादर्शक ठरेल – पाटणकर
वाईल्ड लाईफ कॉन्सर्वेशन सोसायटीच्या मरीन प्रोग्रामचे हेड इंचार्ज वर्धन पाटणकर म्हणाले, अरेबियन सीमधील हंपबॅक व्हेलचा अधिवास, अधिवासाच्या ठिकाणी त्यांच्या वास्तव्याचा कालावधी याबाबत अजूनही कुणालाही स्पष्ट माहिती नाही. भारताला फार मोठे समुद्री जल क्षेत्र लाभले आहे. परंतु या जल क्षेत्रातील सिटेशियन प्रजाती दुर्दैवाने दुर्लक्षित राहिल्या आहेत. या प्रजातीचे एकमेव अस्थलांतरण गुणधर्म, त्यांची धोकादायक स्थिती आणि पूर्व अरब समुद्रातील त्यांच्या अस्तित्वा विषयीची मुलभुल माहितीची कमतरता या दृष्टीने संबधित प्रकल्पाचे महत्त्व आहे.
अभ्यासाच्या पहिल्या टप्प्यात, समुद्री सस्तन प्राण्यांच्या विविधतेचा अभ्यास करण्यासाठी आंग्रिया बँक व त्याच्या आजूबाजूच्या सागरी परिसरामध्ये वैज्ञानिक सर्वेक्षण केले जाईल. त्या नंतरच्या दुसऱया, तिसऱया आणि चौथ्या टप्प्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या समुद्रात मुख्यत्वेकरून सर्वेक्षण केले जाईल. यामध्ये मच्छीमारांशी संवाद, व्हेलच्या शावांमधून आनुवंशिक नमुने गोळा करणे व डेटा संकलित करण्यासाठी किनाऱयावरील लोकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.









