ऑनलाईन टीम / येरेआन :
रशियाच्या मध्यस्थीनंतर आर्मेनिया-अझरबैजान या दोन्ही देशांनी आपापसातील युद्धाला पूर्णविराम दिला आहे.
आर्मेनिया-अझरबैजान या दोन्ही देशात नागोर्नो-काराबाख या विभाजनवादी भूभागावरून मागील दोन आठवड्यापासून युद्ध सुरू होते. या युद्धात दोन्ही देशातील 3 हजारहून अधिक जण मारले गेले आहेत. अखेर हे युद्ध थांबवण्यासाठी रशियाने मध्यस्थी केली. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांच्या पुढाकाराने मॉस्कोमध्ये दोन्ही देशांत आज तब्बल दहा तास चर्चा झाली, या चर्चेनंतर दोन्ही देशांनी युद्धबंदीची घोषणा केली.
युद्धबंदीच्या घोषणेनंतर दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी स्वतंत्र निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये त्यांनी कैद्यांच्या आदानप्रदानीबरोबरच मृत जवानांच्या शोधासाठी परस्परांना सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.
दरम्यान, नागोर्नो-काराबाखला आंतरराष्ट्रीय पातळीवर अझरबैजानचाच भाग मानला जातो. मात्र, या भूभागावरून दोन्ही देशात संघर्ष पेटला होता. दोन्ही देशात तोफा, रणगाडे, क्षेपणास्त्र, हेलिकॉप्टर यांच्या मदतीने थेट एकमेकांवर हल्ले सुरू होते. अखेर आज या युद्धाला पूर्णविराम मिळाला.









