उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांची माहिती
पणजी / प्रतिनिधी
पंतप्रधान कीसान सन्मान निधी या केंद्र सरकारच्या योजने अंतर्गत शिल्लक शेतकऱयांचे फॉर्म भरण्यासाठी पोस्टमन शेतकऱयाच्या दारात फॉर्म घेऊन पोचणार आहे. एकूण कृषी कार्डधारक शेतकरी राज्यात 38 हजार आहेत, त्यातले 21 हजार शेतकरी या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र आहेत. कृषी खात्याने गेल्या वर्षभरात 2 वेळा विशेष शिबिरे लावून राज्यातील 10 हजार शेतकऱयापर्यंत हा लाभ पोचवला आहे. उर्वरित 11 हजार शेतकऱयापर्यंत हा लाभ पोचविण्यासाठी राज्य सरकारच्या कृषी खात्यामार्फत ही जोड मोहीम इंडिया पोस्टमार्फत हाती घेतली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा कृषी मंत्री बाबू कवळेकर यांनी आज दिली.
पोस्टमन हा प्रत्येकाच्या घरी जात असतो व प्रत्येक व्यक्तीपर्यंत त्याचा थेट संपर्क असतो. या पोस्ट खात्याच्या विशेषतेचा लाभ घेण्यासाठी आम्ही पोस्ट खात्याशी संपर्क साधला आणि त्यांनी सुद्धा या गोष्टीला सकारात्मक प्रतिसाद दिला, अशी माहिती कवळेकर यांनी दिली.
यावेळी इंडिया पोस्टतर्फे पोस्ट मास्टर जनरल डॉ. विनोद कुमार आणि पोस्ट ऑफिसचे वरि÷ अधीक्षक सुधीर गोपाळ जाखरे उपस्थीत होते. तसेच कृषी खात्याचे सचिव कुलदीप सिंग गांगड आणि कृषी संचालक नेव्हिल आफोंसो उपस्थित होते.
भारतात पहिल्यांदाच असा उपक्रम राबवला जात आहे ही बाब उपमुख्यमंत्र्यांनी सर्वांच्या नजरेत आणून दिली.
गोव्यातील शेतकऱयांपर्यंत कृषी खात्याची प्रत्येक योजना पोचावी व शेतकऱयांना त्याचा लाभ व्हावा हा या मागचा उद्देश आहे. असे उपक्रम कृषी खात्याच्या प्रत्येक योजने बाबत हाती घेतले जाणार आहेत. जास्तीत जास्त शेतकऱयांना या योजनेचा लाभ व्हावा हा या मागचा हेतू आहे. तसेच कृषी खात्याच्या इतर योजनांमध्ये सुद्धा सुटसुटीत पणा आणला जाणार आहे, असे उपमुख्यमंत्री कवळेकर यांनी सांगितले.
राज्यात 255 पोस्ट ऑफिस आहेत, तसेच 300 कर्मचारी हे पंतप्रधान किसान सन्मानचे फॉर्म भरण्यात गुंतले आहेत. 10 दिवसांपूर्वी प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम सुरु झाला आहे. ज्यात आत्तापर्यंत 5 हजार शेतकऱयांचे फॉर्म भरले आहेत. तसेच ज्यांची बँकेत ठेवीसाठी खाती नाहीत त्यांना इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक मध्ये आधार क्रमांकाच्या साहाय्याने खाती उघडून आमचा पोस्टमन देतो, अशी माहिती पोस्ट मास्तर जनरल डॉ. विनोद कुमार यांनी दिली.
दरम्यान, सरकारी कर्मचारी, निवडून आलेले आजी माजी लोकप्रतिनिधी या योजनेला पात्र नाहीत. आर्थिकदृष्टय़ा दुर्बल शेतकऱयांना ठराविक आर्थिक उत्पन्न मिळावे यासाठी ही योजना आहे. या योजने अंतर्गत वर्षातून 3 वेळा 2 हजार रूपयांचा हप्ता शेतकऱयाच्या बँक खात्यात थेट जमा होतो, असे कृषी संचालक नेव्हिल आफोंसो यांनी यावेळी सांगितले.