बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकच्या एका कोर्टाने शुक्रवारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत विरोधात एफआयआर नोंदविण्याचे निर्देश दिले. कंगनाने ट्वीटच्या माध्यमातून कृषी कायद्याला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना लक्ष करत टीका केली होती. त्यामुळे तुमकुर कोर्टात कंगनावर कृषी कायद्याला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचा अपमान केला असल्याचा आरोप आहे.
अॅडव्होकेट एल. रमेश नाईक यांच्या तक्रारीच्या आधारे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी प्रथम श्रेणी न्यायालयात संबंधित पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत विरूद्ध एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. कोर्टाने म्हटले आहे की तक्रारदाराने सीआरपीसीच्या कलम १५६ (३) अन्वये तपासासाठी अर्ज दाखल केला होता.
कंगनाने कृषी कायद्याला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात वादग्रस्त ट्विट केल्यानंतर वादंग झाला होता. वादंगानंतर कंगनाने हे ट्विट हटविले होते. २१ सप्टेंबर रोजी कंगनाने हे ट्विट केले होते.