बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यातील शेतकऱ्यांची विनंती मान्य करीत केंद्र सरकारने बेंगळूर गुलाबी कांदा आणि कृष्णपुरम कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली आहे. पुढील वर्षी ३१ मार्चपर्यंत शेतकरी १० हजार मेट्रिक टन कांदा निर्यात करु शकतील. निर्यतीस परवानगी मिळाल्यामुळे सरकारने कांद्याची निर्यात फक्त चेन्नई बंदरातूनच केली जाईल, अशी अट घातली आहे.
केंद्रीय कृषी व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी ट्वीट करून शेतकऱ्यांसाठी उचललेलं हे पाऊल शेतकऱ्यांना सक्षम बनवून त्यांचे उत्पन्न वाढवेल. तसेच शेतकऱ्यांना सक्षम बनविण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी, बेंगळूर गुलाबी कांदा आणि कृष्णपुरम कांद्याच्या निर्यातीला दहा हजार मेट्रिक टन पर्यंत सरकार परवानगी देत असल्याचं म्हंटल आहे.
दोन्ही प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीसाठी निर्यातकाला कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील संबंधित बागायती अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र घ्यावे लागेल आणि कांदा निर्यात केला जाण्याचे प्रमाणित करावे लागेल.