सोलापूर / प्रतिनिधी
अभ्यासकांना संशोधनासाठी संधी देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा बसवेश्वर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये अध्यासन केंद्र सुरु करणार. तसेच विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेच्या दरम्यान झालेल्या सायबर हल्ल्याबाबत विद्यापीठ सायबर सेलकडे तक्रार दाखल करणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी दिली.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांनी शुक्रवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास भेट दिली. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा भव्य अश्वारूढ पुतळा व स्मारक विद्यापीठ परिसरात उभारण्यासाठी अडीच कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यातील दीड कोटी रुपये शासन तर 1 कोटी रुपये विद्यापीठ खर्च करणार आहे. अधिक निधी लागला तर जिल्हा नियोजन समितीतून घेण्यात येणार आहे. त्यासंदर्भात पालकमंत्री दत्तात्रय भरणे व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी चर्चा केली आहे.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांनी विद्यापीठातील वॉर रूमची पाहणी केली. परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. प्रारंभी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, कुलसचिव डॉ. विकास घुटे, उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालिका डॉ. राजश्री देशपांडे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक श्रेणिक शहा आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विद्यापीठाकडून करण्यात आलेल्या अंतिम वर्ष, एटी-केटी, बॅकलॉगच्या ऑनलाइन-ऑफलाईन परीक्षेसंदर्भात कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी मंत्री सामंत यांना माहिती दिली. त्यावेळी मंत्री सामंत यांनी सर्व अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश विद्यापीठ प्रशासनास दिले.
——–
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत म्हणाले
-रत्नागिरी आणि सोलापूर येथे पुढील शैक्षणिक वर्षापासून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करणार.
-पुतळÎाचे भूमीपूजन याच महिन्यात करण्याचा राज्य शासनाचा मानस.
-विद्यापीठ अधिकारी, कर्मचारी यांना लवकरच सातवा वेतन आयोग लागू करणार.
-तासिका तत्वावर कार्यरत असणाऱया प्राध्यापकांच्या थकित वेतन आदा करण्यासाठी निधीची तरतूद करणार.
-तासिका तत्वावर भरतीसाठी सेट-नेट उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार.
-प्राध्यापकांची कायमस्वरुपी भरती करता यावी यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार.