खऱयाखुऱया योद्धय़ांची थरारक कहाणी थेट चायना बॉर्डरवरून
- पती लढतोय सीमेवर, तर पत्नी लढतेय कोरोनाशी
- जीवावर उदार होऊन लढत आहेत दोघेही
शेखर सामंत / सिंधुदुर्ग:
एक आहे सिंधुदुर्गचा सुपुत्र आणि दुसरी आहे सिंधुदुर्गची सुकन्या. दोघांमधील नातं आहे पती-पत्नीचं. दोघेही आपले प्राण पणाला लावून देशसेवा करीत आहेत. पती भारत-चीन सीमेवर अगदी गलवान घाटीनजीक चीनसारख्या खतरनाक शत्रूसमोर छातीचा कोट करून पहाडासारखा उभा आहे. तर इकडे सिंधुदुर्गात पत्नी परिचारिका बनून आपल्या कुटुंबियांच्या जीविताची जोखीम पत्करत कोरोनाग्रस्तांच्या सेवेत व्यस्त आहे. दोघेही खरेखुरे वॉरिअर. पती देशसेवेसाठी बलिदान देण्यास सिद्ध, तर पत्नी कोरोनापासून सर्वसामान्यांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी सिद्ध.
मागील दहा महिने ते एकमेकांना भेटलेदेखील नाहीत. गलवान घाटीत युद्धाचे ढग जमू लागल्याने इकडे पत्नी चिंतेत आहे. तर पत्नी कोरोनाग्रस्तांसोबत काम करीत असल्याने तिथे बॉर्डरवर पती चिंतेत आहे. मात्र अशाही परिस्थितीत दोघांनीही देशसेवेला अधिक प्राधान्य दिलं आहे, हे खरोखरच अभिनंदनीय म्हणावे लागेल.
थेट गलवान घाटीतून संवाद
सिंधुदुर्गातील आडेली गावात राहणाऱया नायब सुभेदार संदीप राणे आणि सौ. दीपा राणे या दाम्पत्याची ही कहाणी आहे. नायब सुभेदार संदीप हे गेले दहा महिने आपल्या मराठा बटालीयनसोबत भारत-चीन सीमेवर डोळय़ात तेल घालून सीमेचं रक्षण करीत आहेत. तर सौ. दीपा अधिपरिचारिका बनून शिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाग्रस्तांच्या सेवेत व्यस्त आहेत. भारत-चीन सीमेवर सध्या युद्धाचे ढग जमू लागल्याने साहाजिकच दीपाच्या घरात काहीसे चिंतेचे वातावरण आहे. गलवान घाटीतील धुमश्चक्रीनंतर तर ही चिंता अधिकच वाढली आहे. याच दरम्यान ‘तरुण भारत’च्या माध्यमातून सुभेदार संदीप यांच्याशी थेट भारत-चीन सीमेवर दूरध्वनीद्वारे संपर्क साधून संवाद साधला असता त्यांनी दिलेली माहिती खरोखरच थरकाप उडवणारी आहे.
उणे दहा सेल्सियसमध्येही करावी लागते डय़ुटी
नायब सुभेदार संदीप सध्या समुद्र सपाटीपासून 12,400 फूट उंचीवर गलवान घाटीनजीक सियाचीन ग्लेशियर्सवर डय़ुटी बजावत आहेत. ‘प्रतापपूर सेक्टर’वर त्यांचा बेस कॅम्प आहे. या कॅम्पपासून चायना बॉर्डर 40 किलोमिटर अंतरावर, तर पाकिस्तान बॉर्डर अवघ्या 10 किलोमिटर अंतरावर आहे. या भागात आता बर्फ पडायला सुरुवात झाली असून पुढील महिन्यापासून या ठिकाणचे तापमान उणे 5 ते 10 सेल्सिअस एवढे असणार आहे.
शत्रूपेक्षा लहरी निसर्गाचा धोका अधिक
सुभेदार संदीप यांना त्यांच्या डय़ुटीविषयी विचारले असता ते म्हणाले, माझी डय़ुटी सध्या बेसकॅम्पमध्ये आहे. पण हा बेसकॅम्प अशा ठिकाणी आहे, की या कॅम्पवर कधी लॅण्डस्लायडिंग होऊन कधी जीव जाईल ते सांगता येणार नाही. येथील निसर्ग फारच लहरी आहे. वातावरण कोणत्याही क्षणी बदलेल आणि निसर्गाचा प्रकोप संकट बनून कधी कोसळेल, ते सांगता येत नाही. आतापर्यंत आम्ही जवळपास दहावेळा तरी जीवघेण्या लँडस्लायडिंगपासून वाचलोय, असे ते म्हणाले. या गलवान घाटीत सध्या मराठा रेजिमेंट तैनात झाली आहे. या रेजिमेंटमध्ये माझ्यासारखे अनेकजण सिंधुदुर्गचे सुपुत्र आहेत. याठिकाणी ग्लेशियर्सवर पेट्रोलिंग करताना शत्रूपेक्षा बर्फाचा धोका अधिक असतो, असे ते म्हणाले. या बर्फाने जर पायाला जखम झाले, तर गंगरिन होते व पाय किंवा पायाची बोटे काढून टाकावी लागतात.
तोडीस तोड प्रत्युत्तर देण्यास आम्ही सज्ज
या परिसरात जरी युद्धजन्य परिस्थिती असली, ती युद्ध होईलच असे सांगता येणार नाही. कारण दोन्हीही देश बलवान आहेत. मात्र होणारे युद्ध या दोन्हीही देशांना परवडणारे नाही. मात्र तरी देखील दोन्ही बाजूंनी युद्धाची जोरदार तयारी सुरू असल्याचे ते म्हणाले. तसेच वरिष्ठ पातळीवर दोन्ही बाजूच्या सैन्य अधिकाऱयांची बोलणीही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आपले भारतीय जवान डोळय़ात तेल घालून या भागात तैनात आहेत. गलवान घाटीत चिन्यांना धडा शिकवल्यानंतर शत्रू पक्षाच्या सैनिकांनी आपल्या कुरापतींना आवर घातल्याचे त्यांनी सांगितले. शत्रूला तोडीस तोड प्रत्युत्तर देण्यास आम्ही सज्ज आहोत. देशातील नागरिकांनी निश्चित राहवे, असे ते म्हणाले.
थोडक्यात सांगायचे तर नायब सुभेदार संदीप आणि परिचारिका दीपा हे देशाप्रती देत असलेल्या योगदानाला सलाम करावे तेवढे थोडेच आहेत. ही अशी लोकं आहेत म्हणून आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत. नागरिकांनी अशा लोकांचा सन्मान राखणे गरजेचे आहे. नायब सुभेदार संदीप यांचा व्हॉटस्ऍप क्रमांक आहे 9108882544 आणि अधिपरिचारिका सौ. दीपा यांचा क्रमांक आहे 9421149843.
पत्नीला विषारी बर्फाची, तर पतीला कोरोनाची काळजी
युद्धजन्य परिस्थितीमुळे घरची मंडळी काळजीत असतात का, असे विचारले असता सुभेदार संदीप म्हणाले, आमचं सैनिक घराणं आहे. वडील एक सामान्य शेतकरी होते. मात्र आम्ही तिघा भावांनी सैन्यात नोकरी पत्करली. मोठा भाऊ कॅप्टन पदावरून, तर दोन नंबरचा भाऊ नायब सुभेदार पदावरून नुकताच निवृत्त झाला. माझा पुतण्या देखील नायक पदावरून आर्मीतून निवृत्त झालाय. माझ्या कुटुंबाला सैनिकी वारसा असल्यामुळे बॉर्डरवरचे दडपण कुटुंबात नसते. मात्र पत्नी नेहमी काळजीत असते. येथील युद्धजन्य परिस्थितीपेक्षा तिला अधिक काळजी असते येथील धोकादायक निसर्गाची आणि विषारी बर्फाची. अलिकडे आमचा फारसा संपर्क होत नाही. या ठिकाणी नेटवर्क चांगले असते, त्यावेळी मी तिला फोन लावण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र त्याचवेळी ती पीपीई किट घालून कोरोना डय़ुटीवर असते. त्यामुळे ती फोनवर बोलू शकत नाही. तिला ज्यावेळी माझ्याशी बोलायचे असते, त्यावेळी इथे नेटवर्क मिळत नाही. या अडथळय़ामध्ये आमचे दहा-दहा दिवस बोलणं होत नाही. त्यामुळे टेन्शन असतं. मलाही मुलांची, पत्नीची काळजी वाटते. कारण ती कोरोनाग्रस्तांसोबत वावरत असते. पण देवावर भरोसा ठेवून आम्ही आमचे कर्तव्य बजावत आहोत, असे ते म्हणाले.