आराखडा तयार होताच काम पूर्णत्वाकडे
प्रतिनिधी/ पणजी
राजधानी पणजीतील बसस्थानक, दिवजा सर्कल ते मेरशी जंक्शन या परिसराचा वाहतूक आराखडा पूर्ण झाल्यानंतरच अटल सेतूच्या तिसऱया टप्प्यातील बांधकाम पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.
पर्वरी ते मेरशी जंक्शनपर्यंत उभारण्यात आलेल्या सुमारे 3.2 किमी लांबीच्या या भारतातील तिसऱया क्रमांकाच्या अटल सेतू केबल पुलाचे 27 जानेवारी 2019 रोजी उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर 5 फेब्रुवारी रोजी तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. देशातील पूल बांधकामातील एक अप्रतिम नमुना ठरावा असा हा पूल मांडवी नदीवरील विद्यमान दोन पुलांच्या मधल्या भागात बांधण्यात आला असून दोन्ही पुलांपेक्षा 15 मिटर उंचीवर आहे.
फोंडा, जुने गोवे भागातून येणाऱया वाहनांना पणजीमार्गे थेट म्हापसा जाता यावे यासाठी या पुलाला मेरशी येथून फ्लायओव्हर जोडण्यात आला आहे, तर मडगाव, वास्को भागातून येणाऱया वाहनांसाठी या पुलाला जोडरस्ता बनविण्यात आला आहे. त्याशिवाय तिसरा फ्लायओव्हर हा वरील सर्व भागातून येणाऱया वाहनांना राजधानीतील बसस्थानक परिसरात उतरण्यासाठी असेल. त्या भागाचे पूर्णत्वाकडे पोहोचलेले काम सद्या बंद ठेवण्यात आले आहे.
वाहतूक आराखडय़ामुळे सध्या काम बंद : चोडणेकर
गोवा साधनसुविधा विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी संदीप चोडणेकर म्हणाले की बसस्थानक परिसराच्या नवीन वाहतूक आराखडय़ानुसार काम पूर्ण झालेले नसल्यामुळे अटल सेतूच्या तिसऱया टप्प्याचे काम बंद ठेवण्यात आले आहे. या आराखडय़ानुसार बसस्थानक आणि मेरशी परिसरात दोन मोठी वाहतूक बेटे उभारण्यात येणार आहेत. तसेच दिवजा सर्कलजवळही बरेच फेरबदल करण्यात येणार आहेत.
सध्या बांबोळीवरून पणजीला जोडणाऱया चौपदरी रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे पोहोचलेले असून त्यानंतर वाहतूक आराखडय़ाला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. त्यानंतर अटल सेतूच्या तिसऱया टप्प्याचे कामही पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
मळा खाडीवरील जोड पूलही लवकरच खुला होणार
मळा खाडीवर बांधण्यात आलेल्या जोड पुलापैकी दुसरा पूल अद्याप अपुर्णावस्थेत असल्याबद्दल विचारले असता, तो लवकरच खुला करण्यात येणार असल्याचे चोडणेकर यांनी सांगितले. मळा भागात पाण्याची नैसर्गिक निचरा व्यवस्था योग्य प्रकारे कार्यरत नसल्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून या भागात दरवर्षी पूर येतो. हस्तकला महामंडळाचे कार्यालय असलेल्या भागात मागे खाडी आणि समोर मोठे तळे असून विविध कारणांमुळे तेथील नैसर्गिक निचरा व्यवस्था निकामी झाली आहे.
सदर जोडपुलाच्या बांधकामामुळे त्यात आणखीही बाधा येण्याची शक्यता दिसून आल्यामुळे जल संसाधन खात्यातर्फे तेथे निचरा व्यवस्था निर्माण करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्याशिवाय तेथे पेट्रोल पंपच्या समोरील भागात असलेल्या भंगार यार्डमधील काही विक्रेत्यांनी सदर पुलाच्या बांधकामास हरकत घेऊन अडथळा निर्माण करण्याचे प्रयत्न केल्यामुळेही बराच काळ काम बंद ठेवावे लागले होते.
सध्या हे काम जवळजवळ पूर्ण झालेले असून केवळ डांबरीकरण शिल्लक आहे. जल संसाधन खात्याची कामे पूर्ण होताच डांबरीकरण करून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. विविध कारणांमुळे बांधकामास उशीर झाल्याने मूळ 21 कोटीच्या या पुलाचा खर्च आता काही प्रमाणात वाढणार आहे, असेही चोडणेकर म्हणाले.









