प्रतिनिधी / बेळगाव
रामनगर, वड्डरवाडी येथील एका तरुणाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. रेल्वेस्थानकापासून हाकेच्या अंतरावर पाटील मळय़ाजवळ त्याचा मृतदेह आढळून आला आहे. जीवनाला कंटाळून त्याने टोकाचा निर्णय घेतल्याचे समजते.
राकेश कृष्णा कागलकर (वय 19) रा. रामनगर, वड्डरवाडी असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. राकेश हा गवंडीकाम करीत होता. गेल्या काही महिन्यांपासून तो कोल्हापुरात रहात होता. आठवडाभरापूर्वी बेळगावला आला होता. बुधवारी सकाळी रेल्वेरूळाशेजारी त्याचा मृतदेह आढळून आला.
राकेशने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. ‘माफ करो मुझे’ असे सांगत त्याने आपला भाऊ व वडिलांची माफी मागत मला जीवन बस झाले आहे, सॉरी… मला कुठे शोधू नका. कारण मी कोणाच्या हाती लागणार नाही, असे लिहून ठेवून या तरुणाने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याच्या खिशात आढळलेल्या मोबाईल क्रमांकावरून त्याची ओळख पटविण्यात आली. कौटुंबिक कारणामुळे त्याची मनस्थिती बरी नव्हती. याच मनस्थितीतून राकेशने रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.









