चकित करणारे सर्वेक्षण : 81 टक्के रस्तेदुर्घटनांचे ठरू शकते कारण
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
चालकांची दृष्टी कमी असल्यास दुर्घटनेचा धोका अधिक असतो. देशाच्या 12 राज्यांमध्ये 15 हजार चालकांवर झालेले सर्वेक्षण हेच चित्र मांडते. मिशन फॉर व्हिजन या स्वयंसेवी संस्थेच्या एका सर्वेक्षणानुसार देशात 40 टक्के चालकांची दृष्टीक्षमता योग्य नाही. ही स्थिती 81 टक्क्यांपर्यंत रस्तेदुर्घटनांसाठी कारणीभूत ठरू शकते.
देशात दृष्टीक्षमता आणि वाहन चालविण्यामधील संबंध समजविण्यासाठी स्वयंसेवी संस्थेने अलिकडेच व्हर्च्युअल इंटरनॅशनल कॉन्फरन्स आयोजित केली होती. यात डोळय़ांशी संबंधित विविध संस्थांनी स्वतःचे मत मांडले आहे. हे सर्वेक्षण 2019 ते 2020 दरम्यान करण्यात आल्याची माहिती स्वयंसेवी संस्थेच्या पदाधिकारी सबित्रा कुंडू यांनी दिली आहे. ही स्वयंसेवी संस्था अंधत्व संपुष्टात आणण्यासाठी काम करते.
दृष्टीक्षमता कारणीभूत
देशात रस्त्यांवर होणाऱया 80 टक्के बळींचे कारण दृष्टीक्षमता आहे. यातील 26 टक्क्यांपर्यंत वाणिज्यिक वाहने चालविणारे चालक सामील आहेत. दर 4 पैकी 1 चालक 20 ते 30 मीटर अंतरावरील फलक वाचू शकत नाही. चालकांच्या डोळय़ांची तपासणी अनिवार्य स्वरुपात केली जावी असे तनेजा यांनी म्हटले आहे.
लाखो बळी
2018 मध्ये जगभरात 10.35 लाख लोकांचा मृत्यू रस्ते दुर्घटनेत झाला आणि 5 कोटी जण जखमी झाले. यातील 90 टक्के कनिष्ठ आणि मध्यम उत्पन्न गटाच्या देशांमधील होते. 11 टक्के भारतातील होते. रस्ते दुर्घटनांमध्ये सर्वाधिक बळी 15 ते 29 या वयोगटातील लोकांचा झाल्याची माहिती व्हिजन इम्पॅक्ट इन्स्टीटय़ूटचे व्यवस्थापक क्रिस्टन ग्रॉस यांनी दिली आहे.
1 टक्के वाहने भारतात
जगातील एकूण वाहनांच्या तुलनेत 1 टक्के वाहने भारतात असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात नमूद आहे. जगभरात होणाऱया रस्ते दुर्घटनांपैकी 6 टक्के दुर्घटना भारतात घडतात. देशातील 81 टक्के चालकांमध्ये डोळय़ांशी संबंधित एखादी समस्या अवश्य असते. यातील 30 टक्के चालक इंटरनॅशनल कॉलेज ऑफ ऑप्थेल्मोलॉजिस्टच्या सुरक्षाविषयक दिशानिर्देशांचे पालन करत नसल्याचे बेंगळूर येथील इंडियन इन्स्टीटय़ूट ऑफ सायन्सच्या संशोधन अहवालात म्हटले गेले आहे.
तपासणीच केली नाही देशात रस्ते दुर्घटनांच्या प्रकरणांमध्ये डोळय़ांची क्षमता कमी असण्याची मोठी भूमिका आहे. ही बाब समजविण्यासाठी एक वेगळे अध्ययन केले आहे. यात देशाच्या 30 हजार ट्रकचालकांना सामील केले गेले. संशोधनात 68 टक्के ट्रकचालकांनी कधीच डोळय़ांची तपासणी करवून घेतली नसल्याचे दिसून आले आहे. यातील 60 टक्के चालकांना चष्म्याची गरज होती अशी माहिती व्हिजन स्प्रिंगचे संचालक अंशू तनेजा यांनी परिषदेदरम्यान दिली आहे.