कोगनोळीनजीकच्या दूधगंगा पुलावरील घटना
वार्ताहर/ कोगनोळी
अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी (ता. निपाणी) येथील दूधगंगा नदी पुलावर मंगळवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली. अशोक साताप्पा कोळी (वय 50, रा. हंचिनाळ रोड कोळी मळा, कोगनोळी) असे ठार झालेल्या सायकलस्वाराचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरुन समजलेली अधिक माहिती अशी की, अशोक कोळी हे सायकलवरुन कागलहून कोगनोळीकडे येत असताना दूधगंगा पुलावर आल्यावर दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पाठीमागून अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये कोळी हे सुमारे 15 फूट अंतरावर जाऊन पडले. त्यांच्या पाठीला व डोक्मयाला जबर मार लागला. मोठय़ा प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बी. एस. तळवार, कोगनोळी पोलीस आऊट पोस्टचे अमर चंदनशिव, पी. एम. घस्ती, एस. बी. खोत यांनी भेट दिली. सदर घटना कागल पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली असल्याने कागल पोलीस स्टेशनचे निरीक्षक दत्तात्रय नाळे, हवालदार इंद्रजीत शिंदे व कॉन्स्टेबल सूरज कांबळे यांनी भेट देऊन पाहणी केली. कोळी यांचा मृतदेह विच्छेदनासाठी कागल येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आला. त्यांच्या पश्चात मुलगी, भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे.









