एकाचवेळी दोन्ही आघाडय़ांवर युद्ध लढण्यास तयार : हवाई दल प्रमुखांचा चीनला इशारा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय हवाई दल कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज असून सुरक्षेची स्थिती लक्षात घेऊन, सर्व आवश्यक भागांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक सैन्यबळ तैनात असल्याचे वायुदल प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी सोमवारी स्पष्ट केले. तसेच चीनच्या तुलनेत भारताची हवाई शक्ती अधिक असल्याचा दावाही त्यांनी केला. पूर्व लडाख सीमेवर चीनबरोबर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भदौरिया यांनी हे विधान केले आहे.
चीनची हवाई शक्ती भारताच्या क्षमतेसमोर सरस ठरणार नाही. पण त्याचवेळी आम्ही शत्रूला कमीही लेखणार नसल्याचे भदौरिया यांनी सांगितले. सुरक्षेची स्थिती लक्षात घेऊन, सर्व आवश्यक भागांमध्ये मजबुतीने हवाई दल तैनात आहे. जरी शेजारी राष्ट्रांशी युद्धाची परिस्थिती उद्भवलीच तरी उत्तर आणि पश्चिम सीमेवर एकाचवेळी दोन आघाडय़ांवर युद्ध लढण्यास भारतीय वायुदल सज्ज असल्याचेही वायुदल प्रमुखांनी सांगितले. येत्या 8 ऑक्टोबरला असणाऱया वायुदल दिनाच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. हवाई कवायतीमध्ये एकूण 56 विमाने सहभाग घेणार असून त्यात 19 हेलिकॉप्टर्स आणि 7 मालवाहतूक करणाऱया विमानांचा समावेश असेल.
राफेलमुळे हवाई दल अधिकच ताकदवान
वायुदल दिनाच्या निमित्ताने सर्वांच्या नजरा राफेलकडे असतील. राफेल पहिल्यांदाच फ्लायपास्टमध्ये सहभागी होणार आहे. राफेलच्या समावेशामुळे पहिला आणि प्रभावशाली हल्ला करण्याची क्षमता प्राप्त झाल्याचे देखील भदौरिया म्हणाले. पुढच्या तीन वर्षात राफेल आणि एलसीए मार्क 1 तेजसची स्क्वॉड्रन पूर्ण क्षमतेने कार्यरत होतील. हवाई दलाच्या सध्याच्या ताफ्यात आणखी मिग-29 चा समावेश करण्यासाठी हालचाली सुरू असल्याची माहितीही भदौरिया यांनी दिली.









