वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ऍथलीट्सची कामगिरी आणि त्यांना मार्गदर्शन करणारा प्रशिक्षक वर्ग यांच्यात नेहमीच संबंध राहतो. आता ऍथलीट्सच्या कामगिरीमध्ये अधिक सुधारणा होण्याच्या दृष्टीने साईच्या विविध क्रीडा प्रकारातील प्रशिक्षकांची तसेच साहाय्यक प्रशिक्षक वर्गाची फिटनेस चांचणी वर्षांतून दोनवेळा घेतली जाईल. तसेच प्रशिक्षकांच्या कामगिरीची नोंद करण्यासाठी वैयक्तिक फाईल्स ठेवणेही सक्तीचे असणार आहे.
गेल्या महिन्यात 24 सप्टेंबर रोजी ‘फिट इंडिया’ या नव्या मोहिमेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते करण्यात आले. या मोहिमेच्या उद्घाटनावेळी मोदी यांनी वयोमानानुसार योग्य फिटनेस प्रोटोकॉल तयार करण्याची सूचना दिली होती. आता या प्रोटोकॉलच्या नियमावलीनुसार विविध प्रशिक्षकांची फिटनेस चांचणी वर्षांतून दोनवेळा घेतली जाणार आहे. 18 वर्षांवरील आणि 65 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील प्रशिक्षकांना ही चांचणी द्यावी लागणार आहे. फिटनेस प्रोटोकॉलचा एक भाग म्हणून देशातील विविध साई केंद्रामध्ये नियुक्त केलेल्या विविध वयोगटातील प्रशिक्षकांना आपल्या दहा शारिरीक चांचण्या द्याव्या लागणार आहेत.









