वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रविवारी घेण्यात आलेल्या पाचव्या ऑनलाईन नेमबाजी स्पर्धेत भारताची महिला नेमबाज यशस्विनी सिंग देसवालने महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत सुवर्णपदक पटकाविले. 2021 साली होणाऱया टोकियो ऑलिंपिकसाठी यशस्विनी सिंगने आपले तिकीट यापूर्वीच आरक्षित केले आहे.
23 वर्षीय यशस्विनी सिंगने महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत 241.7 गुण घेत सुवर्णपदक पटकाविले. जागतिक महिला नेमबाजांच्या मानांकनात चौथ्या स्थानावर असलेल्या यशस्विनी सिंगने गेल्यावर्षी रिओ डे जेनेरिओ येथे झालेल्या विश्वचषक नेमबाजीत सुवर्णपदक मिळविले होते. त्याचप्रमाणे गेल्या मे महिन्यात झालेल्या इंटरनॅशनल ऑनलाईन चौथ्या नेमबाजी स्पर्धेत यशस्विनी सिंगने 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत सुवर्णपदक मिळविले होते. या क्रीडा प्रकारात इजिप्तच्या अहमेद नबीलने रौप्यपदक तर शेम्सने कास्यपदक मिळविले. ऑनलाईनद्वारे झालेल्या दोन दिवसांच्या या स्पर्धेत 15 देशांच्या स्पर्धकांनी भाग घेतला होता.









