वार्ताहर/ जैतापूर
राजापूर तालुक्यातील दांडे अणसुरे हा पूल वाहतुकीस धोकादायक असल्याची विनाकारण अफवा उठवली जात असून याद्वारे स्वार्थासाठी राजकारण केले जात आहे. अशी प्रतिक्रिया जैतापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व समाजसेवक सरफराज काझी यांनी व्यक्त केली.
पूल मजबूत व भक्कम असून गेली 5 वर्षे पुलावरून वाहतूक सुरू आहे. इंजिनिअर व इतरांनी पैसे खाण्यासाठीच नवीन पुलाला धोकादायक दाखवून वाढीव पाच कोटीचे इस्टिमेट करण्यात आले आहे. पाच वर्षांपूर्वीदांडे पुलाच्या अँप्रोच स्लँबला भेगा दिसल्याने अँप्रोज स्लॅबला सपोर्टिंग पिलर मजबुतीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने 15 लाखांची निविदा काढली होती व त्याप्रमाणे काम ही सुरू झाले होते. परंतु पावसाळ्याच्या एक महीना अगोदरच सदर 15 लाख रूपयांचे दुरूस्तीचे काम करणाऱया कंपनीचे कामगार फक्त एक मीटरचे काँक्रिटचे काम शिल्लक असताना पळाले कि पळविण्यात आले?
त्यानंतर त्याच पुलावरून गेली चार वर्षे सर्व प्रकारची वाहतूक सुरू असुन ही पुलाच्या अँप्रोच रोडच्या स्लँबच्या मायनर भेगांमध्ये कसलाही फरक झाला नाही. हे काम 15 लाखात होणारे असताना पाच सहा वर्षापुर्वी बांधलेल्या पुलाला पडलेल्या भेगांमुळेमुळे घारपुरे कन्स्ट्रक्शन कंपनी पुणे वर सार्वजनिक बांधकाम खात्याने कोणतीही कारवाई केली नाही.
आमचे माहीतीनुसार व प्रत्यक्ष पहाणीनुसार सदर पुल मजबुत व भक्कम असताना प्रथम 15 लाख रूपयाच्या खर्चाच्या अंदाजपत्रकानुसार अर्धवट असलेले एक मीटर स्लॅबचे काम पुर्ण करून घेण्याचे सोडुन नवीनच पाच कोटीचे परत अंदाजपत्रक करणाऱया सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तत्कालिन अधिक्षक अभियंता वर कारवाई करावी अशी मागणी असून या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार व सार्वजनिक बांधकाम मंत्री यांचेकडे पत्राद्वारे तक्रार करणार आहे असे सरफराज काझी यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले.