प्रतिनिधी/ कराड
ऑलिम्पिकवीर पै. खाशाबा जाधव यांचे सुपूत्र रणजित जाधव यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे विशेष सदिच्छा भेट घेतली. भारताचे पाहिले ऑलिम्पिक पदक विजेते पै. खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे. केंद्रीय पद्म पुरस्कार समितीला तसे आदेश द्यावेत. भारताचे राष्ट्रपती, प्रधानमंत्री यांना विनंती करावी, अशी मागणी राज्यपालांना करण्यात आली.
रणजित जाधव यांनी यावेळी पै. खाशाबा जाधव यांच्या बद्दलची सर्व माहिती त्यांना सांगितली. खाशाबांनी देशाला मिळवून दिलेल्या पहिल्या ऑलिम्पिक पदकाची माहिती दिली. हे ऐतिहसिक ऑलिम्पिक पदक यावेळी दाखवण्यात आले. खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित पुस्तक तसेच प्रतिमा भेट स्वरुपात देण्यात आली. यावेळी ऍड. शामराव जाधव, पै. वैभव मोरे उपस्थित होते.