प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिल्हय़ाची नैसर्गिक संपदा व प्राणी जीवन हा निसर्ग व वन्यजीव प्रेमींसाठी आकर्षणाचा विषय आहे. त्यातूनच चाळकेवाडी पठारावर तासन्तास भटकंती करत तिथे असलेल्या वैविध्यपूर्ण सरडय़ांच्या जातींचा अभ्यास करुन साताऱयातील युवा छायाचित्रकार प्रणित बोरा व धीरज झंवर यांनी तयार केलेल्या ‘फॅन थ्रोटेड लिझार्ड’ या सरडय़ांवरील जीवनपटास आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळाला आहे. यामुळे साताऱयाचे नाव पुन्हा एकदा यानिमित्ताने आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकलेय.
‘नेचर इन फोकस’ ही संस्था ही संस्था 2015 पासून ‘वाईल्ड लाईफ फोटोग्राफी’ ही आंतराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा आयोजित करते. दरवर्षी बेंगळुरू येथे तीन दिवस ही स्पर्धा होत असते. यावर्षी कोरोना स्थितीमुळे ही स्पर्धा ऑनलाईन स्वरुपात घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये संपूर्ण आशिया खंडातील स्पर्धकानी सहभाग घेतला होता. सन 2019 पासून नेचर इन फोकस संस्थेने यामध्ये फिल्म फेस्टिव्हल हा विषय पण सुरू केला. या स्पर्धेत आशिया खंडाबरोबर अमेरिका, युरोप, ओसनिया या खंडामधील राष्ट्रातून स्पर्धकांनी भाग घेतला होता.
या स्पर्धेत फिल्म ऍवॉर्ड कॅटेगरीत इर्मजिंग टॅलेंटस नॅचरल हिस्ट्री या विभागात साताऱयातील धीरज झंवर आणि युवा छायाचित्रकार प्रणित बोरा यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेमध्ये बक्षीस मिळवून साताऱयाला सर्वोच्च पातळीवर नेऊन ठेवले आहे. या दोन प्रतिभावंतांनी आपल्या साताऱयाची शान असलेल्या चाळकेवाडी पठारावरील आढळणाऱया फॅन थ्रोटेड लिझार्ड सरडय़ांच्या वैविध्यपूर्ण जीवनशैलीचा अभ्यास करून त्याच्या जीवनातील प्रत्येक वळणावरील चित्रण करून त्याच्या जीवनावर एक छोटा जीवनपट तयार केला होता.
हाच जीवनपट त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सादर केला. धीरज झंवर आणि प्रणीत बोरा यांनी सादर केलेल्या फॅन थ्रोटेड लिझार्डवर चित्रित फिल्मला नॉमिनेशन मिळाले होते. तर अंतिम स्पर्धेत 25 सप्टेंबर 2020 रोजी सेंकड रँक व फर्स्ट स्पेशल मेन्शन पारितोषिक मिळाले आहे. त्यांच्या या यशाने साताऱयाचे नाव जगाच्या नकाशावर नोंदविले गेले.