५९८ जणांची कोरोनावर मात, रात्रीच्या अहवालात २७७ बाधित
रविवारी २० बाधितांचा मृत्यू, सातारा तालुक्यात वाढ सुरुच
कराड तालुक्यात वेग मंदावला, भीतीचा पगडा कमी झालाय,
७००८ नागरिक होम आयसोलेटड
प्रतिनिधी / सातारा
सप्टेंबर महिन्यात मोठय़ा संख्येने येणाऱ्या बाधितांच्या आकडय़ांनी जिल्हय़ात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यात पुन्हा ऑक्सिजन बेडची कमतरता, वाढणारा मृत्यूदर यामुळे प्रशासनासह नागरिकही गोंधळून गेले होते. मात्र सप्टेंबरच्या अंतिम दिवसात व ऑक्टोबरच्या आरंभी बाधितांचे मोठय़ा संख्येने येणारे आकडे मंदावले आहेत. होम आयसोलेशनचा पर्याय नागरिक स्वीकारत असल्याने भीतीचा पगडाही कमी होत असून वातावरणात दिलासा निर्माण होवू पहात आहे. यामध्ये सातारा तालुक्यात वेग मंदावला असला तरी सातारा तालुका अद्याप हॉटस्पॉट ठरलेला आहे. रविवारी रात्री उशिराच्या अहवालात खूप दिवसांनी २७७ एवढ्या कमी संख्येने बाधितांचा आकडा आला आहे.
दरम्यान, रविवारी सकाळी आलेल्या अहवालात जिल्हय़ात २० बाधितांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. तर सायंकाळी आलेल्या अहवालानुसार जिल्हय़ात 598 नागरिकांना घरी सोडण्यात आले आहे. रात्री उशिराच्या अहवालात २७७ एवढय़ा जणांचे अहवाल बाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिलीय.
कोरोनामुक्तांची संख्या ३० हजार पार
जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 598 नागरिकांना रविवारी सायंकाळपर्यंत घरी सोडण्यात आले आहे. यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या एकूण संख्येने 30 हजारांचा आकडा पार केला असून एकूण कोरोनामुक्तांची संख्या 30,092 एवढी दिलासा देणारी ठरली आहे. यामुळे कोरोनामुक्तीची टक्केवारी 75 वर गेली आहे.
७००८ नागरिक होम आयसोलेटड
गेल्या चार ते पाच दिवसात बाधित वाढण्याचा वेग मंदावतोय. रविवारी सायंकाळपर्यंत उपचारार्थ रुग्णांची संख्या ८,१०१ आहे. मात्र त्यापैकी ७००८ एवढे लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेले नागरिक होम आयसोलेटड आहेत. आरोग्य विभाग त्यांच्या संपर्कात असून प्रत्यक्ष उपचारार्थ असलेल्यांची संख्या १,०९३ एवढी असून त्यांच्यावर कोरोना केअर सेंटर्समध्ये शासकीय व खासगी रुग्णालयात लक्षणांनुसार उपचार सुरु आहेत. होम आयसोलेशनमध्ये असलेले नागरिक १०/१४ दिवसानंतर त्यांना काहीच त्रास न झाल्यास ते कोरोनामुक्त ठरणार आहेत.
जगरहाटी सुरु, भीतीचा पगडा कमी
उद्या ५ ऑक्टोबरपासून आता हॉटेल्स, बार, रेस्टारंट सुरु असून कोरोना स्थितीत जिल्हयातील जगरहाटी सुरुच आहे. त्यात शाळा, महाविद्यालये, खासगी क्लासेस सोडल्यास अनेक गोष्टी आता सुरु होवू लागल्या आहेत. नागरिकांच्या मनातील भीतीचा पगडा कमी होत असून नागरिक स्वतःहून काळजी घेवू लागले आहेत. कोरोना रुग्णांना व त्यांच्या कुटुंबियांना दिलासा देण्यापासून ते ऑक्सिजन चळवळ राबवण्यासाठी मदतीचे हात झटू लागले आहेत.
सोमवारपासून हॉटेल, बार सुरू
राज्य सरकारनं अनलॉक-५ संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार सोमवार ५ ऑक्टोबरपासून हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेनंच सुरू ठेवावी लागतील. गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय फेस मास्क, सॅनिटायझरचा वापर बंधनकारक असेल. सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेण्याच्या सूचनादेखील प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत.
बाधितांमध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक
जिल्हय़ात आतापर्यंत ३९, ४४५ एवढय़ांचा अहवाल बाधित आला आहे. यामध्ये पुरुषांचे प्रमाणे अधिक म्हणजे २३,४८९ आहे. तर बाधितांमध्ये महिलांची संख्या १५,२२९ एवढी आहे. जिल्हय़ात एकूण १,५६८ एवढे झोन आहेत. यापैकी शहरी व ग्रामीण असे ४३७ झोन ऍक्टिव्ह असून तिथे बाधित सापडत आहेत. मात्र शहरी व ग्रामीण १,३३१ झोन इनऍक्टिव्ह झोन असून तिथे बाधित सापडलेले नसल्याने जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनासह सर्वांनी प्रयत्न केल्यास संसर्गाचे प्रमाण कमी होण्यास मदत होव शकेल.
जिल्हय़ात २० बाधितांचा मृत्यू
सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे शाहुपूरी सातारा 20 वर्षीय महिला, तडवळ ता. सातारा 64 वर्षीय पुरुष, वर्धनगड ता. खटाव 45 वर्षीय पुरुष, निढळ ता. खटाव 90 वर्षीय पुरुष, विकासनगर ता. सातारा 76 वर्षीय पुरुष, तसेच विविध खाजगी रुग्णालयामध्य विटा ता. खानापूर सांगली 80 वर्षीय महिला, मिरेवाडी त फलटण 80 वर्षीय पुरुष, गोळीबार मैदान ता. सातारा 64 वर्षीय पुरुष, रेठरे बु. ता. कराड 65 वर्षीय पुरुष, मुंडे, ता. कराड 80 वर्षीय महिला, लावंडमाची ता. कराड 82 वर्षीय पुरुष, कोरेगाव 72 वर्षीय पुरुष, खटाव 61 वर्षीय पुरुष, बिदाल ता. माण 80 वर्षीय पुरुष, मडाली जांब बु. ता. कोरेगांव 73 वर्षीय महिला, सोमवार पेठ ता. कराड 82 वर्षीय पुरुष तर उशीरा कळविलेले जळगेवाडी ता. कराड 47 वर्षीय पुरुष, डिगेवाडी ता. कराड 32 वर्षीय पुरुष, शुक्रवार पेठ ता. कराड 51 वर्षीय पुरुष, दहिवडी ता. माण 79 वर्षीय पुरुष अशा एकूण 20 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
९९ जणांचे नमुने तपासणीला
फलटण येथील 54, पानमळेवाडी 21, महाबळेश्वर 15, पिंपोडा येथील 6 असे एकूण 99 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
रविवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 1,50,024
एकूण बाधित 39,445
एकूण कोरोनामुक्त 30,092
मृत्यू 1,234
उपचारार्थ रुग्ण 8,101
रविवारी
एकूण बाधित 277
एकूण मुक्त 598
एकूण बळी 20