जगातील सर्वात जास्त लांबीचा आणि विशेषतेने भरलेला अटल महामार्ग बोगदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकार्पण केला आणि हिंदुस्थानच्या लष्करी व नागरी प्रगतीत नवा अध्याय लिहिला गेला. लष्करासाठी व हिमाचल प्रदेशसाठी प्रगतीची, उन्नतीची आणि सामर्थ्याची नवी दारे खुली झाली. या बोगद्याने नव्या भारताची दिशा आणि धमक स्पष्ट झाली आहे. भारत बदलतो आहे, बलवान होतो आहे हे या निमित्ताने अधोरेखित झाले आहे. रोहतांगमधील ही सुधारणा सर्व भारतवासियांना आणि हिमाचल व लेह लडाखमधील नागरिकांना, भारतीय सैन्यदलाला अभिमानास्पद ठरली आहे. रस्ते, पूल, बोगदे केवळ दोन गावे किंवा दोन प्रदेशांना जोडत नाहीत तर त्या दोन्ही ठिकाणी भाषा, साहित्य, संस्कृती, व्यापार, रोटीबेटी व्यवहाराला चालना देत असतात. माणसे जोडत असतात, प्रगती साधत असतात, वेळ-इंधन-पैसा यांची बचत करत नवे अध्याय रचले जातात हे अनेकवेळा दिसून आले आहे. आपल्याकडे मुंबई-पुणे हा एक्सप्रेस हायवे करण्यात आला त्यापूर्वीची अवस्था आणि हा मार्ग झाल्यानंतरची गती, प्रगती, सोय, सुविधा यांची अनुभूती आपण घेतो आहोत. केंद्रीय रस्ते व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा कामाचा झपाटा आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा यातून मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे झाला. गडकरी यांना लोक रोडकरी, पूलकरी म्हणून ओळखू लागले.गडकरी यांनी मुंबईत इतके रस्ते, उड्डाण पूल बांधले की त्यामुळे मुंबईची वाहतूक कोंडी संपली. मुंबई-पुणे प्रवास दोन तासावर आला, नवी सुधारणा झाली. हिमाचल आणि लेह लडाखला जोडणारा बोगदा हवा अशी फार दिवसांची मागणी होती. या बोगद्याचे लष्करी महत्त्वही होते. पोखरणमध्ये कुणाची तमा आणि निर्बंध न जुमानता तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी अणू चाचण्या यशस्वी केल्या आणि भारत आता डगमगणार नाही आम्ही शक्तीपूर्ण आहोत याचा जगापुढे कृतीशील पाठ ठेवला. त्याच वाजपेयींनी या हिमाचल-लेहलडाखला जोडणाऱया बोगद्याला मंजुरी दिली, नारळ फोडला पण हे काम पूर्ण होण्यास इतकी वर्षे उलटली. नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान आणि गडकरींसारखा मंत्री सत्तारुढ व्हावा लागला आणि शनिवारी हा बोगदा लोकार्पण झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांनी तो लोकार्पण केला आणि सर्वांना या बोगद्याचे परिणाम दिसून आले व पुढे येतील. या बोगद्याला स्व. अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले ते सर्वथा उचित आहे त्यांनीच हा पाया रचला होता व तो बोगदा पूर्ण झाल्याने त्यांची व हिमाचल प्रदेशातील जनतेची स्वप्नपूर्ती झाली. या बोगद्याची विशेषतः म्हणजे तो 9.2 किमी लांबीचा आहे, इतका लांब बोगदा जगात इतरत्र नाही तो केवळ लांब नाही तर सर्वाधिक उंचीवर आहे, 10,040 फुटावर हा बोगदा खोदला आहे. बोगद्यामुळे मनाली ते लेह अंतर 46 कि.मी.ने कमी होणार आहे. दोन हजार साली सुरू झालेले हे काम रखडले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर या कामाला गती नव्हे तर महागती दिली. अन्यथा हे काम 2040 पर्यंत पूर्ण झाले नसते. लेह लडाख सीमेवर नेहमीच तणाव असतो. चीनने अलीकडे रोज कुरापती सुरू केल्या आहेत. आपले सैन्य त्याला जशास तसे उत्तर देत आहे. हिंदुस्थान पूर्वीचा उरलेला नाही. आम्ही शांतताप्रिय आहोत पण सामर्थ्यवान आहोत, आम्ही कोणतीही आगळीक, घुसखोरी, छेडछाड सहन करणार नाही. प्रसंगी घुसून आम्ही धडा शिकवतो हे सर्जिकल स्ट्राईक व अलीकडे चीन आगळीकीवेळी आपल्या बहादूर जवानांनी दाखवून दिले. मोदी दिवाळीत आणि अनेकवेळा सैन्यदलासोबत असतात,राजनाथसिंह असतात ते केवळ फोटोसाठी वा चमकोगिरीसाठी नाहीत तर लष्कर सुसज्ज व सुविधाजनक, सामर्थ्यवान करण्यासाठी यांचा प्रत्यय पुनः पुन्हा आला. भारतीय लष्कर, हवाई दल, नौदल यासाठी अनेक साधनसुविधा दिल्या आहेत. पाकिस्तान, चीन यांचे नापाक इरादे उधळून लावण्याचे सामर्थ्य व तळ उभारण्यात आपणास यश मिळाले आहे आणि त्यातीलच अटल बोगदा ही कडी आहे. बोगद्यामुळे चीनला लागून असलेल्या लडाख आणि पाकिस्तानला लागून असलेल्या कारगिलपर्यंत भारतीय सैन्याला सहज पोचता येणार आहे. या बोगद्यामुळे केवळ दीड तासात मनाली ते केलांगपर्यंत पोहोचता येणार आहे. या बोगद्यात प्रत्येक 150 मीटरवर टेलिफोनची सुविधा, 60 मी.वर हायड्रेंट, 500 मी.वर आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याचा मार्ग, प्रत्येक 1 किमीवर हवेची गुणवत्ता तपासली जाणार आहे. त्याचबरोबर 250 मी.वर सीसीटीव्ही कॅमेरेदेखील असतील, युद्धनीती विषयात धोरणाचा हा बोगदामार्ग महत्त्वाचा भाग ठरला आहे म्हणून हा अटलबोगदा केवळ बोगदा नाही तर ती जादूची गुहा आहे. लेह-लडाख पर्यटनाला बोगद्याने चालना मिळणार आहे आणि बर्फवृष्टीमुळे तुटणारा संपर्क अखंड राहणार आहे. सीमेवर सैन्याला गतीने रसद पुरवता येणार आहे, भारतीय सैन्याला बोगदा वरदान ठरला आहे. भारताकडे वाकडय़ा नजरेने बघणाऱयांचे या सुविधेमुळे तोंड फुटले आहे. मोदी सरकारने बिहारमध्ये कोसी सेतूचे कामही गतीने पूर्ण केले. बिहार निवडणुकीत अटल बोगदा आणि कोसी सेतू प्रचारमुद्दे असणार हे ओघाने आहे. राजकारण होत राहील.आरोप-प्रत्यारोप होत राहतील लोकशाहीत ते गरजेचे आहे पण त्यापलीकडे जाऊन आव्हानात्मक आणि देश समृद्ध करणारी कामे व्हायला हवीत. अटल बोगदा हे असेच काम आहे. त्यांचे मनस्वी स्वागत केले पाहिजे. अटलबोगद्याने नवा इतिहास रचला आहे हा बोगदा नाही तर जादूची गुहा ठरणार आहे.
Previous Articleतेजस यादव, तेजप्रताप यादव यांच्यासह 6 जणांवर गुन्हा दाखल
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








