बेंगळूर
कन्नड चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार ड्रग्ज प्रकरणाच्या जाळय़ात अडकले असून या प्रकरणातील प्रमुख आरोपी विरेन खन्ना याची पॉलिग्राफ चाचणी करण्यास न्यायालयाने संमती दर्शविली आहे. ड्रग्ज प्रकरणी अभिनेत्री रागिणी द्विवेदी, संजना गल्रानी यांच्यासह 15 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये विरेन खन्नाचाही समावेश आहे. विदेशातून अमली पदार्थ आणून बेंगळूरमध्ये मोठमोठय़ा पाटर्य़ा आयोजित करून तेथे पुरवठा करत होता, असा आरोप आहे. बेंगळूरच्या सीसीबी पोलिसांनी त्याची पॉलिग्राफ चाचणी करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. याला न्यायालयाने संमती दर्शविली आहे. चौकशीवेळी स्पष्ट माहिती देण्यास विरेन खन्ना टाळाटाळ करीत आहे. त्यामुळेच त्याची बेंगळूरच्या फोरेन्सिक लॅबमध्ये पॉलिग्राफ चाचणी केली जाणार आहे.









