प्रेंच ओपन ग्रँडस्लॅम : श्मीडलोव्हा, स्विटोलिना, ऍनिसिमोव्हा, रुबलेव्ह तिसऱया फेरीत
वृत्तसंस्था / पॅरिस
पेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत बेलारुसच्या व्हिक्टोरिया अझारेन्काला दुसऱयाच फेरीत पराभवाचा धक्का बसला तर एलिना स्विटोलिना, अमांदा ऍनिसिमोव्हा, रशियाचा तेरावा मानांकित आंद्रेय रुबलेव्ह यांनी आगेकूच केली आहे. मात्र अझारेन्काप्रमाणे अमेरिकेच्या सॅम क्वेरीचे आव्हानही समाप्त झाले आहे. अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने दुखापतीमुळे दुसऱया फेरीच्या सामन्याआधीच माघार घेतल्याने 24 वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचे तिचे स्वप्न पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे.

दहाव्या मानांकित अझारेन्काने याच महिन्यात झालेल्या अमेरिकन ओपन स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले होते. पण हा जोम तिला येथील स्पर्धेत टिकविता आला नाही. स्लोव्हाकियाच्या ऍना कॅरोलिना श्मीडलोव्हाने तिला 6-2, 6-2 असे सहज हरवित तिचे आव्हान संपुष्टात आणले. श्मीडलोव्हाने 2019 मध्ये गुडघ्यावर शस्त्रक्रिया करवून घेतली होती. तिने येथे झोकात पुनरागमन करताना पहिल्या फेरीत व्हीनसला हरविले होते.
युक्रेनच्या तिसऱया मानांकित स्विटोलिनाने मेक्सिकोच्या पात्रता फेरीतून आलेल्या रेनाटा झाराझुआचा 6-3, 0-6, 6-2 असा संघर्ष करीत पराभव केला. गेल्याच आठवडय़ात स्विटोलिनाने स्ट्रासबर्ग टेनिस स्पर्धेचे जेतेपद मिळविले आहे. तिची लढत रशियाच्या एकतेरिना अलेक्झांड्रोव्हाशी होणार आहे. अन्य एका सामन्यात अमेरिकेच्या युवा ऍनिसिमोव्हाने आपल्याच देशाच्या बर्नार्डा पेराचा 6-2, 6-0 असा धुव्वा उडवित तिसरी फेरी गाठली. तिची पुढील लढत हॅलेप किंवा बेगू यापैकी एकीशी होईल. गेल्या वर्षी तिने हॅलेपला उपांत्यपूर्व फेरीत हरविले होते.
पुरुष एकेरीत रशियाच्या तेराव्या मानांकित रुबलेव्हने पराभवाच्या उंबरठय़ावर असतानाही विजय खेचून आणत दुसरी फेरी गाठली. अमेरिकेच्या सॅम क्वेरीविरुद्ध त्याने दोन सेट गमविले होते आणि तिसऱया सेटमध्ये 2-5 असा पिछाडीवर होता. पण त्याने झुंजार खेळ करीत हा सेट तर जिंकलाच, पुढील दोन सेट्सही जिंकून त्याने आगेकूच केली. रुबलेव्हने क्वेरीचा 6-7 (5-7), 6-7 (4-7), 7-5, 6-4, 6-3 असा पराभव केला. मेदवेदेव्हविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही रुबलेव्हने असाच पाच सेट्समध्ये संघर्षपूर्ण विजय मिळविला होता. सेरेना विल्यम्सची माघार
अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला 24 व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाने अनेकदा हुलकावणी दिली आहे आणि यावेळी त्यात काही बदल झाला नाही. मात्र यावेळी तिला टाचेला झालेल्या दुखापतीमुळे दुसऱया फेरीचा सामना सुरू होण्याआधीच प्रशिक्षक पॅट्रिक यांच्याशी चर्चा करून तिने माघार घेतल्याचे आयोजकांना सांगितले. अमेरिकन ओपन स्पर्धेत अझारेन्काविरुद्ध झालेल्या उपांत्य लढतीवेळी तिच्या टाचेला ही दुखापत झाली होती. ती आता चिघळल्याने तिने माघारीचा निर्णय घेतला.
6 आठवडे विश्रांती

आपल्याला सकाळी चालताही येत नव्हते, इतका त्रास होत असल्याचे तिने स्पष्ट केले. या दुखापतीतून बरे होण्यासाठी किमान चार ते सहा आठवडय़ाचा कालावधी लागणार असल्याने या वर्षातील उर्वरित मोसमात आता कोणत्याही स्पर्धेत सहभागी होणार नसल्याचेही तिने सांगितले. अमेरिकन स्पर्धेनंतर या दुखापतीतून सावरण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याने ती चिघळल्याचे तिने सांगितले. 2014 मध्ये ती या स्पर्धेच्या दुसऱया फेरीत पराभूत झाली होती. त्यानंतर एखाद्या ग्रँडस्लॅममधून इतक्या लवकर बाहेर पडण्याची तिची ही पहिलीच वेळ आहे. 2018 मध्ये तिने या स्पर्धेच्या चौथ्या फेरीतून माघार घेतली होती.









