झिंकच्या कमतरतेला तोंड देणाऱया लोकांना कोरोनाची बाधा झाल्यास मृत्यू होण्याचा धोका दोनपट अधिक आहे. हा दावा स्पेनच्या वैज्ञानिकांनी केला आहे. कोरोनाबाधितांमध्ये झिंकची कमतरता असल्यास त्यांच्यात सूज येण्याची प्रकरणे वाढतात, हा प्रकार मृत्यूचा धोका वाढवत असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.
बार्सिलोनाच्या टर्शियरी युनिव्हर्सिटी हॉस्पिटलच्या संशोधकांनी कोरोनाबाधितांमधील झिंकच्या कमतरतेच्या अभावाचा प्रभाव मांडला आहे. 15 मार्च ते 30 एप्रिल 2020 पर्यंत कोरोनाबाधितांवर संशोधन करण्यात आले. संशोधनात प्रकृती अत्यंत नाजूक असलेल्या रुग्णांना सामील करण्यात आले होते. त्यांची प्रकृती, ठावठिकाण्याशी संबंधित आकडेवारी, पूर्वी झालेल्या आजारांची नोंद करण्यात आली आहे.
बाधितांमध्ये झिंक गरजेचे
संशोधनानुसार झिंकचे प्रमाण पुरेसे किंवा अधिक असलेल्या कोरोनाबाधितांमध्ये इंटरल्युकिन-6 प्रोटीनचे प्रमाण कमी होते. तर झिंक कमी असलेल्या बाधितांमध्ये या प्रोटीनची पातळी अधिक होती. हे प्रोटीन शरीरात सूज आणि रोगप्रतिकारकशक्ती नियंत्रणहीन होण्यासाठी जबाबदार असते. रोगप्रतिकारक शक्ती नियंत्रणहीन झाल्यास त्यातून शरीराला नुकसान पोहोचू लागते. शरीरात प्लाझ्मा झिंकची पातळी जर 50 एमसीजी/डी पेक्षा खाली आल्यास मृत्यूचा धोका 2.3 पटीपर्यंत वाढतो. शरीरात झिंकचे प्रमाण त्याहून अधिक असावे. दररोज 40 एमजी झिंकची गरज शरीराला भासते.
झिंकची कमतरता दूर करणारे पदार्थ
स्पेनच्या संशोधकांनी दिली माहिती
टरबूजाच्या बिया आणि नट्स : यात झिंक आणि पोटॅशियम पुरेशा प्रमाणात असते. टरबूजाच्या बिया सुकवून त्याचे पूड तयार करून ती जेवणात सामील करता येऊ शकते.
मासे : यात झिंक, प्रोटीनसह अनेक पोषक तत्वे चांगल्या प्रमाणात असतात. आठवडय़ात दोनवेळा यांचा आहारात समावेश केला जाऊ शकतो.
अंडी : एका अंडय़ात 5 टक्क्यांपर्यंत झिंक असते. अंडय़ाचा दररोजच्या आहारात समावेश केला जावा. हे इम्युनिटी वाढविण्यासह डॅमेज झालेल्या मांसपेशी बऱया करतात.
दुग्धोत्पादने : मांसाहारी नसल्यास आहारात दुग्धोत्पादनांचे प्रमाण वाढविले जाऊ शकते. दूध, चीज, दहीद्वारे देखील झिंकची कमतरता दूर केली जाऊ शकते.
डार्क चॉकलेट : हे झिंकची कमतरता दूर करते तसेच मासिक पाळीत होणाऱया वेदनेपासूनही दिलासा देते. डार्क चॉकलेट मेटाबॉलिज्म चांगले करण्यासह मूड चांगला ठेवते.