सध्या दिवस आहेत ते ‘आयपीएल’चे…मात्र मैदानावरील खेळाबरोबरच पडद्यामागं ‘ऑनलाईन फँटसी गेमिंग’चा खेळ कसा रंगू लागलाय अन् त्यातून अब्जावधींची उलाढाल कशी होऊ लागलीय त्यावर टाकलेला हा दृष्टिक्षेप…
सध्या चालू असलेल्या ‘भारतीय प्रीमियर लीग’चा (आयपीएल) प्रचंड लाभ खात्रीनं मिळणार तो ‘ऑनलाईन फँटसी गेमिंग मार्केट’ला…त्याचा स्फोट झाल्यास, भडका उडाल्यास आश्चर्यचकीत होण्याची गरज नाहीये…या क्षेत्रातील ‘प्लेयर्स’ व तज्ञांच्या मतानुसार, चाहते खेळाडूंच्या भविष्यातील कामगिरीसंबंधी भाकीत करण्यावर बहुतेक ओतणार तब्बल एक ते दीड अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 7 हजार ते 10 हजार कोटी रुपये…आपल्या देशातील खेळाडूंचं मैदानावरील दर्शन तब्बल सहा महिन्यांनी घडल्यामुळं ‘युजर्स’ना, क्रिकेटवेडय़ांना खेचण्यासाठी ‘ड्रीम इलेव्हन’, ‘माय इलेव्हन सर्कल’, ‘हालापे’, ‘पेटीएम’ आणि ‘मोबाईल प्रीमियर लीग’ (एमपीएल) या ‘प्लॅटफॉर्म्स’मध्ये चाललीय जीवघेणी स्पर्धा…मार्च महिन्यात ‘कोव्हिड-19’नं भारताला धडक दिल्यानंतर ग्राहकांवर पाळी आली ती घरात बसण्याची. त्यांना एखादा सिनेमा, दूरचित्रावाणी मालिका वा ‘स्पोर्ट्स चॅनल’वर एखादी ‘लाईव्ह मॅच’ पाहण्याची संधी मिळालेली नसल्यानं कंपन्यांनी यावेळी मोठय़ा प्रमाणात वृद्धी नोंदविण्याची शक्यता व्यक्त केलीय…
‘फँटसी गेमिंग प्लॅटफॉर्म्स’नी ‘मार्केटिंग’साठी कोटय़वधी रुपये खर्च केलेले असून जोरदार मुसंडी मारलीय ती ‘ड्रीम इलेव्हन’नं. त्यांनी 222 कोटी रुपयांच्या साहाय्यानं ‘इंडियन प्रीमियर लीग’ची ‘टाइटल स्पॉन्सरशिप’ देखील पटकावलीय. त्यांच्यात क्षमता आहे ती बाजारपेठेतील उत्साह जास्तीत जास्त वाढविण्याची…‘इंडस्ट्री प्लेयर्स’च्या मते, ‘फँटसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म्स’वरील ग्राहकांची संख्या येऊ घातलेल्या दिवसांत तब्बल 12 ते 15 कोटींपर्यंत निश्चितच झेपावणार (सध्या सुमारे 9 कोटी). मागील चार वर्षांत या क्षेत्रानं जी तुफानी प्रगती पाहिलीय त्याचा विचार करता हा विश्वास सार्थ म्हणावा लागेल. कारण 2016 मध्ये त्यांच्याकडे आकृष्ट झालेल्यांची संख्या होती अवघी 20 लाख. ती 2019 मध्ये पोहोचली 9 कोटींच्या घरात. ‘फँटसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म्स’चा 80 टक्के भाग काबिज केलाय तो ‘क्रिकेट’नं…‘ड्रीम इलेव्हन’नं त्यांच्या ‘युजर्स’चा आकडा किमान 10 कोटींपर्यंत वाढणार असा अंदाज आत्मविश्वासानं व्यक्त केलाय (यापूर्वी सुमारे 8 कोटी 20 लाख)…
‘घरात बसलेल्या ग्राहकाला फारसं काही करण्याची गरज नाहीये. आम्हाला भारतातील ‘शेअर मार्केट्स’मध्ये काय घडतंय त्याची माहिती ‘झिरोद्धा’सारखे ‘प्लॅटफॉर्म्स’ देतात. त्यांच्या साहाय्यानं ‘रिटेल ट्रेडिंग’ करणं शक्य असतं. ‘फँटसी स्पोर्ट्स’ही तसंच’, एका विश्लेषकाचे शब्द…‘काँटेस्ट अँट्री अमाउंट’चा विचार केल्यास ‘फँटसी गेमिंग मार्केट’ला दर्शन घडलंय ते तब्बल 167 टक्क्यांच्या वृद्धीचं. ‘विश्वकरंडक’ व ‘इंंडियन प्रीमियर लीग’ यांच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी, 2019-20 आर्थिक वर्षात रकमेनं नोंद केली ती चक्क 16 हजार 500 कोटी रुपयांची. एका अभ्यासातील निष्कर्षानुसार, ‘ऑपरेटर’ महसूल तिप्पटीनं वधारून 2018-19 मधील 924 कोटींवरून 2019-20 साली 2 हजार 470 कोटी रुपयांवर पोहोचला…अन्य एका अंदाजाप्रमाणं गेल्या वर्षी ‘आयपीएल’ चालू असताना क्रिकेटवेडय़ांनी ‘फँटसी गेमिंग प्लॅटफॉर्म्स’वर ओतले चार ते पाच हजार कोटी रुपये. ‘रिटेल’ला स्वप्नं दिसतात ती दिवाळीच्या दिवसांची, तर ‘फँटसी गेमिंग प्लॅटफॉर्म्स’ना ‘आयपीएल’ची…
‘पेटीएम फर्स्ट’नं काही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकरची ‘ब्रँड ऍम्बॅसॅडर’ म्हणून निवड केलीय. चालू आर्थिक वर्षातील पुढील सहा महिन्यांत ‘मार्केटिंग’ नि ‘प्रोमोशन’वर खर्च करण्यासाठी त्यांनी 300 कोटी रुपयांची तरतूद केलीय…दुसरीकडे, ‘ड्रीम इलेव्हन’ला महेंद्रसिंग धोनी, ‘एमपीएल’ला विराट कोहली आणि ‘माय इलेव्हन सर्कल’ला सौरव गांगुली दिशा दाखवतोय…या पार्श्वभूमीवर अमेरिका व इतर देशांत ‘फँटसी स्पोर्ट्स’ला मिळालेल्या प्रतिसादानं तोंडाला पाणी सुटलेल्या ‘व्हेंच्यर कॅपिटलिस्ट्स’चं लक्ष भारताकडेही वळलंय आणि त्यांनी गुंतवणूक करण्यास सुरुवात देखील केलीय. काहींना त्यामुळं आठवण होऊ लागलीय ती यापूर्वी आपल्याकडील ‘ई-कॉमर्स’ क्षेत्रात जे चित्र पाहायला मिळालं होतं त्याची…2015 मध्ये 25 दशलक्ष डॉलर्स इतकं असलेलं या गुंतवणुकीचं प्रमाण यंदाच्या वर्षी आतापर्यंत 337 दशलक्ष डॉलर्सवर पोहोचलंय…
तसे या क्षेत्राला अलीकडच्या काळात काही धक्केही बसलेत… ‘आयपीएल’ सुरू होण्याच्या काही दिवस आधी ‘गुगल’नं वित्तीय सेवा ऍप ‘पेटीएम’ नि ‘पेटीएम फर्स्ट गेम्स’ला आपल्या ‘प्ले स्टोअर’वरून डच्चू दिला होता तो आपल्या जुगारविषयक धोरणांचा भंग होत असल्याचा ठपका ठेवून. ही वार्ता पसरल्यानंतर काही कमी खळबळ उडाली नव्हती. ‘पेटीएम’ला त्यांच्या ‘पेटीएम क्रिकेट लीग’ नावाच्या ‘यूपीआय कॅशबॅक’ उपक्रमामुळं या कारवाईचं दर्शन घ्यावं लागलं. अर्थात नंतर लगेच या ‘ऍप’नं ‘प्ले स्टोअर’वर पुनरागमन केलं ती गोष्ट वेगळी…भारतात ‘स्पोर्ट्स बेटिंग’ म्हणजे खेळावर सट्टा लावण्यास बंदी आहे. मात्र ग्राहकांनी पसंती दिलेले संघ वा खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्यास जिंकण्याची संधी जे क्षेत्र देतं त्या ‘फँटसी स्पोर्ट्स गेमिंग’ला मात्र अनेक राज्यांत मुभा मिळालीय…
‘कोरोना’चा फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’च्या काळात या ‘ऍप्स’चा वापर करणाऱयांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळाली. ‘फँटसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म्स’वर एप्रिल ते जूनदरम्यान समाधान मानण्याची पाळी आली होती ती 50-60 लाख ग्राहकांच्या सहभागावर. चालू असलेल्या 2020-21 आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत असा तडाखा सहन करावा लागला तो ‘आयपीएल’ झालेली नसल्यानं. ‘इंडियन प्रीमियर लीग’ या उद्योगाच्या महसुलात तब्बल 35 ते 40 टक्के वाटा उचलतेय यावरून तिचं महत्त्व लक्षात यावं… हळूहळू ही परिस्थिती बदलू लागली ती आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू झाल्यानं. उदाहरणार्थ ‘मोबाईल प्रीमियर लीग’नं हल्लीच झालेल्या ‘वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड’ तसंच ‘इंग्लंड विरुद्ध आयर्लंड’ या मालिकांवेळी ग्राहकांचा सहभाग खूप वाढल्याचा दावा केलाय (परंतु उद्योगातील काही जाणकारांना क्रिकेटवरील हे प्रचंड अवलंबन हा चिंतेचा विषय वाटतोय). ‘आयपीएल’च्या अनुपस्थितीत काही ‘प्लेयर्स’नी मोर्चा वळविला तो अन्य खेळांकडे अन् क्रिकेटच्याच इतर स्पर्धांकडे… ‘एमपीएल’च्या अनुसार मागील दोन महिन्यांत विविध प्रमुख ‘फुटबॉल लीग’ मार्गी लागल्यानं ‘फँटसी फुटबॉल’ही वाढीस लागतोय… या पार्श्वभूमीवर येत्या सहा महिन्यांत 200 हून अधिक स्पर्धा या मंचावर झळकणार असून त्यात स्थानिक नि आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा, फुटबॉल लीगसह समावेश असेल तो इतर खेळांचाही! वाढती गुंतवणूक…
‘ड्रीम इलेव्हन’नं यंदा अमेरिकी गुंतवणूक समूह ‘टायगर ग्लोबल मॅनेजमेंट’ व ‘टीपीजी कॅपिटल’, ‘ख्रिस कॅपिटल’, ‘फूटपाथ व्हेंच्यर्स’ यांच्याकडून 225 दशलक्ष डॉलर्सचा निधी उभा केलाय. आपल्याकडील एखाद्या ‘गेमिंग स्टार्टअप’मध्ये यंदा झालेली ही सर्वांत मोठी गुंतवणूक. यापूर्वी 2018 साली चिनी ‘गेमिंग’ व ‘सोशल मीडिया’ कंपनी ‘टेनसेंट होल्डिंग्स’नं त्यात 100 दशलक्ष डॉलर्स गुंतविले होते (पण बदलत्या परिस्थितीत त्यांचा वाटा खाली आलाय)…
‘एमपीएल’नं देखील काही दिवसांपूर्वी अमेरिकास्थित ‘एसआयजी’ नि मॉस्कोतील (रशिया) ‘आरटीपी ग्लोबल’, ‘एमडीआय व्हेंच्यर्स’, ‘पेगासस् टेक व्हेंच्यर्स’ यांच्याकडून खेचून आणलीय ती 90 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक. यामुळं त्यातील एकूण गुंतवणूक 130.5 दशलक्ष डॉलर्सवर गेलीय. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात ‘मोबाईल प्रीमियर लीग’मध्ये ‘सिक्वोया इंडिया’, ‘टाइम्स इंटरनेट’ आणि ‘गोव्हेंच्यर्स’ यांनी 35.5 दशलक्ष डॉलर्सची राशी ओतली होती. ‘एमपीएल’चं भारताखेरीज अस्तित्व आहे ते इंडोनेशियात..
– राजू प्रभू