कोल्हापूरकरांसाठी दिलासादायी चित्र, सात दिवसांत पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये घट,
मृत्यूदर तीन टक्क्यावरून 2.5 टक्क्यांवर, कोरोनामुक्त संख्या शेकड्यांवरून 1 हजारांवर
व्हेटिंलेटर, ऑक्सिजन बेडची प्रतिक्षा संपतेय
कृष्णात पुरेकर / कोल्हापूर
जिल्ह्यात कोरोनाने वाढवलेली धास्ती हळूहळू कमी होतेय. सप्टेंबरच्या दुसऱया पंधरवड्यात गेल्या 7 दिवसांत जिल्ह्यातील मृत्यूदर 3.4 वरून 2.4 टक्क्यांवर आला आहे. पॉझिटिव्ह रूग्ण टक्केवारी 30 वरून 20 टक्क्यांवर आली आहे. सरासरी 700 पर्यत असलेली कोरोनामुक्तांची संख्या बुधवारी 1 हजारांवर गेली. सप्ताहभरातील कोरोनामुक्तांच्या वाढत्या टक्केवारीने कोरोना कमी होतोय, असे दिलासादायी चित्र तयार झाले आहे.
जिल्ह्यात मार्चमध्ये कोरोनाचे दोन रूग्ण होते. जूनपर्यत ही संख्या 884 झाली. त्यावेळी पॉझिटिव्ह दर 7 टक्के तर कोरोनामुक्त 94 टक्के होते. लॉकडाऊन उठू लागले अन् कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू लागला. जुलैमध्ये पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 5,462 होती. पॉझिटिव्ह टक्केवारी 21 टक्क्यांवर पोहोचली तर कोरोनामुक्तांची टक्केवारी 40 पर्यत घसरली. ऑगस्टमध्ये सामुहिक संसर्ग सुरू झाला अन् सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यांपर्यत रूग्णसंख्या वाढली, संसर्ग रोखण्यासाठी जनता कर्फ्यू, लॉकडाऊन केले. तरीही संसर्गात वाढ होत राहिली. ऑगस्टमध्ये पॉझिटिव्ह रूग्ण टक्केवारी 29 वर पोहोचली. याचवेळी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्याने कोरोनामुक्तांची टक्केवारी 69 टक्क्यांपर्यत पोहोचली.
ऑगस्टमध्ये कम्युनिटी स्प्रेडमुळे पॉझिटिव्ह रूग्णसंख्या वाढली, कोरोना बळींही वाढले. व्हेटिलेटर, ऑक्सिजन बेडसाठी प्रतिक्षा अन् संसर्गाची भीती काही प्रमाणात कारणीभूत ठरली. कोरोनाची कोमॉर्बिड रूग्णांनी अधिक धास्ती घेतली. प्रशासनाने ऑक्सिजनेटेड बेडसह केअर सेंटरची संख्या वाढवली, रूग्णसंख्येचा सर्वाधिक ताण सीपीआरवर राहिला, तरीही कोरोना नियंत्रणासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरूच राहिले.
सप्टेंबरमध्ये सद्यस्थितीत कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 43 हजारांवर आहे तर कोरोनामुक्तांची संख्या 32 हजारांवर आहे. कोरोना बळींची संख्या 1365 गेली आहे. गेल्या सहा दिवसांत अपवाद वगळता कोरोना मृत्यूदर 3.9 टक्क्यांवरून 2.7 टक्क्यांपर्यत खाली आला आहे. कोरोनामुक्तांची संख्या सरासरी 700 वरून 1 हजारांवर गेल्याने यापुर्वी 10 हजारांवर असलेली कोरोना रूग्णसंख्या सरासरी 9 हजारापर्यत खाली आली आहे. त्यातून पॉझिटिव्ह रूग्ण टक्केवारी 30 वरून 20 टक्क्यांपर्यत खाली आल्याची माहिती साथरोग नियंत्रण विभागाने दिली. कोरोनामुक्तांची संख्या वाढल्याने सीपीआरसह अन्य केअर सेंटरवर ऑक्सिजन बेड उपलब्ध होऊ लागले आहेत. त्यामुळे व्हेटिलेटर, ऑक्सिजनेटेड बेडची प्रतिक्षा कमी झाली आहे. कोरोना घटतोयचे दिलासादायक चित्र हळूहळू पहायला मिळत आहे.
महिना पॉझिटिव्ह टक्केवारी कोरोनामुक्त टक्केवारी
मार्च ते जून 6.89 95.59
जुलै 21.41 38.67
ऑगस्ट 28.29 68.70
सप्टेंबर 36.29 74.61
गेल्या सप्ताहभरातील कोरोना आकडेवारी :
तारीख पॉझिटिव्ह रूग्ण कोरोनामुक्त रूग्ण कोरोना मृत्यू
21 सप्टेंबर 461 788 21
22 सप्टेंबर 473 632 27
23 सप्टेंबर 714 1038 17
24 सप्टेंबर 627 637 15
25 सप्टेंबर 563 361 17
26 सप्टेंबर 546 416 10
27 सप्टेंबर 460 427 12
जिल्ह्यात ग्रामीण भागात 48.50 तर शहरी भागात 48.36 तर अन्य जिल्ह्यातील 3.59 टक्के कोरोना रूग्ण आहेत. यामध्ये महिलांची संख्या 38 टक्के तर पुरूष रूग्णांची संख्या 63 टक्के आहे. जिल्ह्यात गेल्या सप्ताहात पॉझिटिव्ह दर 30.4 टक्के होता तो सध्या 21.6 टक्के आहे. मृत्यूदर 3.9 टक्के होता तो आता 2.9 टक्के आहे.









