मयांकची 50 चेंडूत 106 धावांची आतषबाजी, केएल राहुलचाही झंझावात
वृत्तसंस्था/ शारजा
शारजाच्या छोटय़ा मैदानाचा पुरेपूर लाभ घेणाऱया शतकवीर मयांक अगरवाल व केएल राहुल यांनी 183 धावांची विक्रमी भागीदारी साकारल्यानंतर पंजाब किंग्स इलेव्हनने आयपीएल साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध 20 षटकात 2 बाद 223 धावांचा डोंगर रचला. मयांकने 50 चेंडूत 10 चौकार व 7 उत्तूंग षटकारांसह 106 धावांची आतषबाजी केली तर केएल राहुलने देखील त्याला पूरक साथ देताना 54 चेंडूत 69 धावा फटकावल्या. त्याच्या खेळीत 7 चौकार व एका षटकाराचा समावेश राहिला.
डावातील पाचव्या षटकात केएल राहुलने 21 धावा पूर्ण करत हंगामात सर्वाधिक धावा जमवणाऱया फलंदाजांच्या यादीत अव्वलस्थान काबीज केले आणि नंतरही त्याचा धडाका कायम राहिला. या जोडीने 8 व्या षटकात 19 तर 9 व्या षटकात 16 धावा वसूल केल्या व त्यानंतर जवळपास प्रत्येक षटकात 10 च्या आसपास किंवा त्याहून अधिक धावा फटकावण्यात त्यांनी कमालीचे सातत्य राखले.
या लढतीत प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर केएल राहुल व मयांक यांनी प्रारंभापासूनच आक्रमणाचा जोरदार धडाका लावला आणि या उभयतांच्या फटकेबाजीमुळे राजस्थान रॉयल्ससमोर जणू कोणतेच पर्याय उपलब्ध नव्हते. प्रतिस्पर्धी कर्णधार स्टीव्ह स्मिथने या उभयतांना रोखण्यासाठी सातत्याने गोलंदाजीत नवनवे प्रयोग राबवले. पण, या दोघांनी त्यातील प्रत्येक गोलंदाजाचा खरपूस समाचार घेण्यात कोणत्याही प्रकारची कसर सोडली नाही.
वास्तविक, राजस्थानने नाणेफेक जिंकल्यानंतर येथील छोटय़ा मैदानावर पंजाबला प्रथम फलंदाजी देण्याचा जुगार खेळला. पण, तो त्यांच्यावरच उलटल्याचे पंजाबच्या सलामी जोडीनेच अधोरेखित केले. केएल राहुल मागील लढतीतही बहारदार फॉर्ममध्ये होता. तोच फॉर्म त्याने येथेही कायम राखला तर मयांकने त्याचा कित्ता गिरवत जोरदार फटकेबाजी केली.
राजस्थानच्या ताफ्यात जोफ्रा आर्चरसारखे बिनीचे गोलंदाज असले तरी या उभयतांच्या फटकेबाजीला रोखण्याचे कोणतेच रामबाण अस्त्र त्यांच्याकडे नव्हते, असे येथे स्पष्ट झाले. या जोडीने पहिल्या षटकात केवळ 3 धावाच घेतल्या असल्या तरी दुसऱया षटकापासून त्यांचा खरा धडाका सुरु झाला. रजपूतचा दुसऱया षटकातील तिसरा चेंडू मयांकने मिडऑफच्या दिशेने षटकारासाठी पिटाळला आणि यानंतर पंजाबने राजस्थानला जणू दिवसाही तारे दाखवले.
अखेर डावातील 17 व्या षटकात ही जोडी टॉम करणने फोडली. मयांक अगरवालने त्याच्या लो फुलटॉसवर षटकार खेचण्याच्या प्रयत्नात डीप मिडविकेटवरील सॅमसनकडे झेल दिला. यानंतर केएल राहुलही रजपूतच्या गोलंदाजीवर थर्डमॅनवरील गोपालकडे झेल देत बाद झाला. अंतिम टप्प्यात निकोलस पूरनची 8 चेंडूतील 25 धावांची फटकेबाजी लक्षवेधी ठरली. मॅक्सवेल 9 चेंडूत 13 धावांवर नाबाद राहिला.
राजस्थानला 17 व्या षटकात लाभले पहिले यश!
टी-20 क्रिकेटमध्ये जवळपास प्रत्येक गोलंदाज पहिल्या षटकापासूनच आक्रमणावर भर देत असल्याने त्यांची बाद होण्याची शक्यता देखील त्यामुळे तितकीच वाढते. पण, पंजाब-राजस्थान यांच्या लढतीत येथे अनोखे चित्र पाहण्यात आले. येथे राजस्थान रॉयल्सला पंजाबची सलामी जोडी फोडण्यासाठी देखील चक्क डावातील 18 व्या षटकापर्यंत प्रतीक्षा करावी लागली. निर्धारित 20 षटकांच्या लढतीत पहिला गडी बाद करण्यासाठी एखाद्या संघाला 18 व्या षटकापर्यंत प्रतीक्षा करावी लागण्याचा या हंगामातील हा पहिलाच प्रसंग ठरला.









