देशाच्या भविष्यासाठी गोळय़ा झेलण्यास तयार
वृत्तसंस्था/ गोरखपूर
बॉलिवूडमध्ये अमली पदार्थांच्या वापराचा मुद्दा लोकसभेत उपस्थित करणारे भाजप खासदार रवि किशन यांना ड्रग्स माफियांकडून धमक्या मिळू लागल्या आहेत. गोरखपूरचे खासदार तसेच अभिनेते रवि किशन यांनी देशाच्या भविष्याला अमली पदार्थांच्या तावडीत सापडण्यापासून वाचविण्याकरता माफियांच्या बंदुकीची गोळी खाण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.
चित्रपट अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर चित्रपटसृष्टीतील अमली पदार्थांचा वापर होत असल्याचे समोर आल्यावर लोकसभेत हा मुद्दा उपस्थित करणाऱया रवि किशन यांनी बॉलिवूड तसेच देशात फैलावत असलेल्या ड्रग्स कनेक्शनवर भूमिका मांडली आहे. धमकी मिळाली असली तरीही याप्रकरणी माझा आवाज उठवत राहणार आहे. चित्रपटसृष्टी आणि तरुणांच्या भविष्यासाठी स्वतःचे म्हणणे मांडणारच, असे त्यांनी म्हटले आहे.
लोकसभेत अमली पदार्थांचा मुद्दा मांडल्यावर रवि किशन यांना धमक्या मिळू लागल्या आहेत. भाजप खासदार दिल्ली येथून गोरखपूर येथे पोहोचले आहेत. अमली पदार्थांच्या मुद्दय़ावरून ते उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊ शकतात. तसेच धमक्यांबद्दल माहिती देऊ शकतात. सुशांत सिंग राजपूत प्रकरणी अमली पदार्थांचे कनेक्शन समोर आल्यावर रवि किशन यांनी देशात हजारो कोटींचा अमली पदार्थांचा व्यापार सुरू असल्याचे म्हटले होते.









