कागल /प्रतिनिधी
कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीच्या रस्त्यावर, लक्ष्मी टेकडीजवळ छोटा टेंपो आणि मोटरसायकल यांच्यात अपघात झाला. या अपघातात निपाणी तालुक्यातील भिवशी येथील मधुकर नाना पाटील ( वय ४३ ) या मोटरसायकलस्वाराचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला . रविवारी दुपारी सव्वा बारा वाजता ही घटना घडली आहे .
कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधून कळंबा येथील सुरज नाईक हा टेंपोचालक टेंपोमधून आॉक्सिजनच्या टाक्या घेऊन कोल्हापूरला चालला होता. लक्ष्मी टेकडी जवळ आल्यानंतर एमआयडीसी रोडवरील चौकात वळण घेत असलेल्या दुचाकीस्वाराला भरधाव वेगातील टेंपोने ठोकरले. तसेच मोटरसायकल स्वाराला काही अंतर फरफटत नेले. यामध्ये पाटील हे गंभीर जखमी झाले . टेंपो चालक आणि मालक यांनी अपघातातील जखमी मधुकर नाना पाटील वय ४३ यांना उपचारासाठी कोल्हापूरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान मधुकर पाटील यांचा मृत्यू झाला.
पाटील हे निपाणी तालुक्यातील भिवशी येथील आहेत. घटनास्थळी कागल आणि गोकुळ शिरगांव पोलिसांनी भेट दिली.अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली . तसेच कागल पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेतली. रात्री उशीरा या घटनेची नोंद कागल पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे .
Previous Articleकोल्हापूर : धारदार कात्रीने वार करून मुलाकडून बापाचा खून
Next Article आता संकेश्वर-रेडी मार्ग होणार









