वार्ताहर / खानापूर
खानापूर येथील मातोश्री कोविड उपचार सेंटरला समाजातील सर्व स्तरातून मदत मिळत आहे. खानापूर शहर मेडिकल असोसिएशनच्या वतीने १५ हजार शंभर रुपयांची मदत माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदेंच्या उपस्थितीत डॉ. उदय हजारे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. ऑक्सिजन मशीनसह आर्थिक मदतही मोठ्या प्रमाणात मिळाली असून खानापूर सारख्या ग्रामीण भागात कोविड सेंटर मधून तात्काळ उपचार मिळत असल्याने परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.
येथील मातोश्री मंगल कार्यालयात माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे व डॉ उदय हजारे यांच्या पुढाकाराने कोविड उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. या उपचार केंद्रास खानापूर परिसरातून जवळपास दहा ऑक्सिजन मशीन भेट देण्यात आले आहेत. त्याचबरोबर लेंगरे येथील शांतारामशेठ शिंदे यांनी कोविड सेंटरला दोन ऑक्सिजन मशीन भेट दिल्या. तसेच बलवडी(खा) येथील सामाजिक कार्यकर्ते शंकरराव देवकर यांनी ५१ हजार रुपये, मातोश्री वेणूताई चव्हाण विद्यालय २५ हजार, इंजि. पांडुरंग गायकवाड ११ हजार, दीपक जाधव ११ हजार, मारुती गायकवाड १० हजार रुपये, यशवंत हसबे १० हजार रुपये, ऍड युवराज गोडसे ५ हजार रुपये अशी मदत करण्यात आली आहे.
या सेंटर मधून उपचार घेऊन आजपर्यंत सहा रुग्ण बरे झाले असून अजून चांगले उपचार होण्यासाठी हाय फ्लो ऑक्सिजन मशीन लवकरच उपलब्ध होतील, अशी माहिती मातोश्री कोविड उपचार केंद्राचे संचालक डॉ. उदय हजारे यांनी दिली. यावेळी लालासो पाटील, सुजित कदम, गजानन टिंगरे, अमोल मुळीक, कैलास टिंगरे, दीनानाथ डोंगरे, दत्तप्रसाद डोंगरे, पिंटू जाधव यांच्यासह शहरातील मेडिकल मालक उपस्थित होते.
Previous Articleसांगली जिल्ह्यात 855 कोरोनामुक्त, नवे 430 रूग्ण
Next Article दापोलीत सापडला 37 फुटी व्हेल








