ऑनलाईन टीम / कोलकाता :
पश्चिम बंगालमध्ये एक ऑक्टोबरपासून चित्रपटगृह खुली होणार आहेत. 50 लोकांची उपस्थिती, सोशल डिस्टन्सिंगचे पालन आणि मास्क बंधनकारक करून चित्रपटगृहांना परवानगी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रदूर्भावामुळे देशभरात मागील काही महिन्यांपासून चित्रपटगृह बंद आहेत. काही दिवसांपासून केंद्र सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली आहे. अनेक गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याने मनोरंजन क्षेत्राशी निगडित चित्रपटगृह, नाटक आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांना परवानगी देण्याची मागणी टीएमसी खासदार, नुसरत जहाँ, मिमी चक्रवर्ती आणि अन्य लोकांनी केली होती.
त्यानंतर मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी एक ऑक्टोबरपासून चित्रपटगृह, नाटक, मॅजिक शो, म्युझिकल व नृत्य कार्यक्रमाला 50 लोकांच्या उपस्थितीच्या अटीवर परवानगी दिली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन आणि मास्क बंधनकारक असणार आहे.









