ऑनलाईन टीम / पुणे :
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) वतीने देण्यात येणारा या वर्षीचा राजर्षी शाहू छत्रपती पुरस्कार ‘कन्या छात्रालय’ (हरसूल, नाशिक) या आदिवासी आणि वनवासी पाड्यांवरील विद्यार्थिनींना शिक्षणाची सुविधा देणार्या संस्थेला जाहीर करण्यात आला आहे.
पर्सिस्टंट सिस्टिम लिमिटेडचे संस्थापक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. आनंद देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत शाहू छत्रपती कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. डीईएसच्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष महेश आठवले, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
येत्या सोमवारी (28 सप्टेंबर) सकाळी अकरा वाजता ऑनलाइन पद्धतीने पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. एक लाख रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. संस्थेचे प्रथम अध्यक्ष राजर्षी शाहू छत्रपती, कोल्हापूर यांच्या स्मृतिनिमित्त सन 2016 पासून शिक्षण/विज्ञान/पर्यावरण/सामाजिक कार्य या क्षेत्रांत विशेष योगदान देणार्या राष्ट्रीय स्तरावरील नामवंत व्यक्ती किंवा संस्था यांचा दरवर्षी या पुरस्काराने सन्मान केला जातो.