प्रतिनिधी / गगनबावडा
कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला पर्यटन तालुका असलेल्या गगनबावड्याला निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभले आहे. उन्हाळी, पावसाळी, हिवाळी अशा तिन्हीं ऋतूत हे निसर्ग सौंदर्य बहरलेले असते. मात्र निसर्गाच्या सौंदर्यांची मुक्त उधळण पहायची असेल. या सौंदर्याचा आस्वाद व अनुभव घ्यायचा असेल तर गगनबावड्यात वर्षा पर्यटनासारखा योग नाही. कधी रिमझिम तर कधी मुसळदार पडणारा पाऊस दुथडी भरून वाहणाऱ्या नदया, खळखळणारे नाले, तुडुंब भरलेले तलाव, हजारो फुट उंचीवर कोसळणारे जल प्रताप, हिरव्या मखमलीत चादरीत लपलेला निसर्ग आणी हे सर्व सौंदर्य व्दिगुणीत करणारा निसर्गाचा पावसाही पुष्पोत्सव !
फक्त पावसाळ्यात उमलणारी शेकडो प्रजातीची रानफुले अशी निसर्गाची विविधांगी रूपे अनुभवण्यासाठी पावसाळ्यात गगनबावड्या सारखे दुसरे ठिकाण नाही. ऑगस्टपासून म्हणजेच श्रावण महिन्यात ऊन व पावसाचा लपंडाव सुरू होतो अशा या पोषक वातावरणात जंगल, नदीकाठ, मैदान व पठार अशा सर्वच ठिकाणी विविधांगी रानफुले उगलू लागतात. कुठे शुभ्र धवल तर कुठे जर्द पिवळ्या रंगाच्या फुलांचा पसरलेला गालीचा आपले मन मोहून घेते.
सध्या तालुक्यातील अनेक माळरानांवर म्हणजे करळा, कवडी, डोलारा, हरण फुलांचा बहर पहावयास मिळत आहे. हिरव्यागार कडीवर उमललेली सुंदर पिवळे धमक फुले लक्षवेधून घेत आहेत. त्या फुलांच्या गालीच्यावर काही काळ पहुडावे त्या फुलांसोबत सेल्फी काढावी असे वाटल्याशिवाय राहत नाही. आपले आराध्य दैवत श्री गणपतीच्या उत्सवात माठीची शोभा वाढविणारी ही सोनार्डीची फुले गणपतीला जास्वंदीच्या फुला एवढीच प्रिय आहेत.
कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर मार्च महिन्यापासून वेळोवेळी प्रशासनाने जाहिर केलेल्या संचारबंदीमूळे येथील पर्यटन स्थळांवर शुकशुकाट जाणवत आहे. करुळ घाटातील सनसेट पॉइंटवर तर सेल्फी काढण्याचा मोह कोणाला आवरत नाही. प. पुज्य. स्वामी गगनगिरी महाराजांची तपोभूमी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सचिव रामचंद्र पंत अमात्य यांची कर्मभूमी म्हणून ओळख असलेला गगनबावडा फुलांनी बहरला आहे